काँग्रेसचे माजी अध्यक्ष आणि वायनाडचे (केरळ) खासदार राहुल गांधी यांनी १४ जानेवारी रोजी मणिपूरमधून ‘भारत जोडो न्याय यात्रे’ला सुरूवात केली. ही पदयात्रा १८ जानेवारी रोजी आसाममध्ये दाखल झाली आहे. २५ जानेवारीपर्यंत ही यात्रा आसामच्या वेगवेगळ्या जिल्ह्यांमधून मार्गक्रमण करणार आहे. दरम्यान, आसाममध्ये राहुल गांधींच्या पदयात्रेला भाजपाकडून विरोध होत आहे. रविवारी (२१ जानेवारी) आसामच्या सोनितपूर भागातील जमुगुरीघाट येथून ही यात्रा जात असताना भाजपा समर्थकांनी काँग्रेसचे राज्यसभेचे खासदार जयराम रमेश यांच्या कारवर हल्ला केला. या हल्ल्याचा एक व्हिडिओ काँग्रेसने समाजमाध्यमांवर शेअर केला आहे.

दरम्यान, आसामच्या सोनितपूर भागात भाजपा कार्यकर्त्यांनी राहुल गांधींची बस रोखली. तसेच भाजपा कार्यकर्ते काँग्रेस कार्यकर्त्यांशी हमरीतुमरीवर आले होते. त्याचवेळी राहुल गांधी बसमधून खाली उतरले आणि हा गोंधळ थांबवण्यासाठी गर्दीत घुसले. त्याचवेळी राहुल गांधी यांच्या सुरक्षेसाठी तैनात असलेल्या जवानांनी राहुल गांधी यांना माघारी फिरायला लावलं. त्यानंतर राहुल गांधी बसमध्ये बसले. यावेळी बाहेर उभ्या भाजपा कार्यकर्त्यांनी मोदी-मोदी अशा घोषणा दिल्या. परंतु, त्यावर राहुल गांधी यांनी संताप व्यक्त न करता या सर्व भाजपा कार्यकर्त्यांना फ्लाईंग किस दिलं.

या घटनेचा व्हिडीओ शेअर करत काँग्रेसने म्हटलं आहे, “सबके लिए खुली है मोहब्बत की दुकान, जुड़ेगा भारत, जीतेगा हिंदुस्तान!” (प्रेमाचं दुकान सर्वांसाठी खुलं आहे. या यात्रेद्वारे भारत जोडला जाईल आणि हिंदुस्थान जिंकेल)

पदयात्रेवर हल्ला करणाऱ्या लोकांच्या हातात भाजपाचा झेंडे होते. तसेच त्यांच्यापैकी काहीजण राहुल गांधी यांच्या बससमोर आले आणि त्यांनी बस थांबवली. बाहेर काँग्रेस कार्यकर्ते आणि भाजपा कार्यकर्त्यांचा गोंधळ वाढला होता. त्यामुळे राहुल गांधी यांनी बसमधून खाली उतरण्याचा निर्णय घेतला. त्यांनी बस थांबवायला सांगितली. त्यानंतर राहुल गांधी बसमधून उतरले आणि त्यांनी हा गोंधळ थांबवण्याचा प्रयत्न केला. दरम्यान, यावेळी पदयात्रा रोखणाऱ्या काही तरुणांनी पदयात्रेचं चित्रण करणाऱ्या एका ब्लॉगरचा कॅमेरा, ओळखपत्र आणि इतर उपकरणं हिसकावली.

काँग्रेसने समाजमाध्यमांवर या घटनेची माहिती देताना म्हटलं आहे की, यावेळी प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींना मारहाण झाली. त्यानंतर परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी अतिरिक्त पोलीस अधीक्षक घटनास्थळी दाखल झाले.

हे ही वाचा >> आसाममध्ये भारत जोडो न्याय यात्रेवर भाजपा कार्यकर्त्यांचा हल्ला; काँग्रेसने शेअर केला व्हिडिओ

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

काँग्रेसचे सचिव जयराम रमेश म्हणाले, आम्ही जमुगुरीघाट येथून जात असताना भाजपाचे झेंडे हाती घेतलेल्या एका अनियंत्रित जमावाने माझ्या गाडीला घेरलं. त्यांनी गाडीला लावलेले भारत जोडो न्याय यात्रेचे स्टिकर फाडून टाकले. तसेच त्यांनी काँग्रेस आणि या यात्रेविरोधात घोषणाबाजी केली. गाडीच्या काचेवर पाणी फेकले. आम्ही मात्र शांत राहून त्यांना कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही.