भारतातील आघाडीची इ-कॉर्मस सर्च साइट आस्क मी आर्थिक अडचणीत सापडली आहे. त्यामुळे कंपनी लवकरच बंद होणार आहे. कंपनीच्या या निर्णयामुळे सुमारे चार हजार कर्मचाऱ्यांवर बेकारीची कुऱ्हाड कोसळणार आहे.
गुरगाव येथे मुख्य कार्यालय असलेल्या कंपनीची वेबसाइट अजून सुरू असली तरी कंपनीने नवीन ऑर्डर घेणे बंद केले आहे. कंपनीचे प्रमुख गुंतवणूकदार अॅस्ट्रो होल्डिंगने अचानक माघार घेतल्याने आस्क मी अडचणीत आल्याचे सूत्रांनी सांगितले. कंपनीच्या भागधारकांसोबत झालेल्या दीर्घ वादानंतर मलेशिया स्थित अब्जाधीश आनंद कृष्णन संचलित अॅस्ट्रो होल्डिंगने गत महिन्यात सुमारे १५० कोटी रूपयांची गुंतवणूक कंपनीत केली होती. अॅस्ट्रो होल्डिंगची आस्क मी ग्रूपमध्ये ९७ टक्के भागीदारी आहे.
वार्षिक अडीच ते सहा लाख पॅकेज असलेल्या ६५० हून अधिक कर्मचाऱ्यांनी राजीनामा दिला आहे. कंपनीने व्यवसाय बंद करण्याचा अचानक निर्णय घेतल्याने सुमारे चार हजाराहून अधिक कर्मचारी, पुरवठादार व वित्तीय संस्था अडचणीत आल्या आहेत.
आस्क मी डॉट कॉमने २०१० साली क्लासिफाईड पोर्टल सुरू केले. त्यानंतर २०१२ मध्ये ऑनलाइन शॉपिंग पोर्टल आस्क मी बझार सुरू केले. २०१३ मध्ये आस्क मी ने गेटीट ही कंपनी ताब्यात घेतली होती. कंपनीचे भारतातील ७० शहरात १२ हजाराहून अधिक व्यापारी सभासद होते. आस्क मी पे व आस्क मी फिन नावाने कंपनीने आर्थिक क्षेत्रात प्रवेश केला होता. त्याचबरोबर कंपनीने वर्ष २०१५ मध्ये मेबलकार्ट या ऑनलाइन फर्निचर कंपनीत २० दशलक्ष डॉलरची गुंतवणूक केली होती.
संग्रहित लेख, दिनांक 19th Aug 2016 रोजी प्रकाशित
आर्थिक अडचणीमुळे इ कॉमर्स साइट आस्क मी बंद होणार
कंपनीच्या या निर्णयामुळे सुमारे चार हजार कर्मचाऱ्यांवर बेकारीची कुऱ्हाड कोसळणार आहे.
Written by लोकसत्ता टीम02shraddhaw

First published on: 19-08-2016 at 19:01 IST
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Consumer internet search platform askme has shut down