ब्रिटनमध्ये करोनाचा नवीन प्रकार आढळून आल्याने जगभरामध्ये खळबळ उडलेली असतानाच मायावती यांच्या बहुजन समाजवादी पार्टीच्या (बसपा) नेत्याने शेतामधील ताडी ही करोनावर सर्वोत्तम उपाय असल्याचा अजब दावा केला आहे. बसपाचे उत्तर प्रदेशमधील प्रमुख नेते भीम राजभार यांनी एका सर्वाजनिक कार्यक्रमामध्ये कार्यकर्त्यांना संबोधित करताना हे वक्तव्य केलं आहे. ताडी प्यायल्याने करोनाचा संसर्ग होत नाही असा दावा करतानाच राजभार यांनी ताडी ही गंगेच्या पाण्यापेक्षा जास्त शुद्ध असल्याचेही म्हटले आहे.
बलियामधील रासरा येथे सोमवारी कार्यकर्त्यांच्या मेळाव्यामध्ये बोलताना राजभार यांनी शेतामध्ये उत्पादन घेतल्या जाणाऱ्या ताडीचं महत्व कार्यकर्त्यांना समजावून सांगितलं. आमच्या समाजामध्ये (राजभार समाजात) ताडीला गंगेच्या पाण्यापेक्षाही पवित्र मानलं जातं. ताडीमध्ये रोगप्रतिकारशक्ती वाढवणारे गुण असतात. ताडी प्यायल्याने करोना होत नाही, असा दावा राजभार यांनी केला. तसेच पुढे बोलताना, आमच्या समाजातील अनेकजण भरपूर ताडी पितात. याच कारणामुळे त्यांना करोनाचा संसर्ग होत नाही असंही राजभार म्हणाले. राजभार समाजामध्ये लहान मुलांनाही ताडी पाजली जाते असा संदर्भ देत भीम राजभार यांनी उपस्थितांना ताडीचं महत्व समाजवून सांगण्याचा प्रयत्न केला.
मात्र भीम राजभार यांनी केलेल्या दाव्याला कोणताही वैज्ञानिक पुरावा उपलब्ध नाहीय. ताडीमुळे करोनाचा संसर्ग होत नाही यासंदर्भात पुरव्यासह दावा करता येणार अभ्यास अद्याप कोठेही झालेला नाही. त्यामुळेच राजभार यांच्या दाव्याबद्दल शंका उपस्थित केली जात आहे. भारतामधील करोनाबाधितांची संख्या एक कोटींच्या पुढे गेली आहे. त्यातच अशाप्रकारच्या वक्तव्यांमुळे सर्वसामान्यांमध्ये संभ्रम निर्माण होण्याची शक्यता अधिक असते.
विरोधकांवरही साधला निशाणा
उत्तर प्रदेशमधील माजी कॅबिनेट मंत्री आणि सुहेलदेव भारतीय समाज पार्टीचे मुख्य नेता असणाऱ्या प्रकाश राजभार यांच्यावरही भीम राजभार यांनी टीका केली. काही लोकं राजभर समाजातील लोकांची दिशाभूल करत आहेत. आपल्या खासगी फाद्यासाठी ते समाजाची फसवणूक करत आहेत. समाजातील सर्व लोकांनी यांच्यापासून सावध राहिलं पाहिजे. आपल्या समाजातील लोकांना केवळ बीएसपीमध्येच सन्मान मिळू शकतो, असंही भीम राजभार म्हणाले.