प्रेमाचे प्रतिक समजल्या जाणाऱ्या ताजमहालवरुन सध्या देशभरात द्वेषाचे राजकारण सुरु आहे. भाजपचे नेते आणि आमदार संगीत सोम यांनी ताजमहालला ‘गद्दारांची निर्मिती’ आणि ‘भारतीय संस्कृतीवरील कलंक’ म्हटल्यानंतर एमआयएमचे अध्यक्ष असदुद्दीन ओवैसी यांनी त्यांच्यावर पलटवार केला आहे. ‘लाल किल्लादेखील ‘गद्दारां’नीच उभारला होता. मग आता पंतप्रधान नरेंद्र मोदी लाल किल्ल्यावरुन तिरंगा फडकावणे बंद करणार का?’ असा सवाल ओवैसी यांनी उपस्थित केला आहे. यासोबतच ओवैसींनी राम मंदिराच्या उभारणीवरुनही उत्तर प्रदेश सरकारवर टीका केली. ‘उत्तर प्रदेश सरकार सामान्य करदात्यांचा पैसा श्रीरामाच्या पुतळा उभारणीसाठी कसे काय वापरु शकते? हे सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशांचे उल्लंघन आहे,’ असे त्यांनी म्हटले.

उत्तर प्रदेश सरकारने महिन्याच्या सुरुवातीला राज्यातील पर्यटनस्थळांची यादी प्रसिद्ध केली होती. यामध्ये ताजमहालला स्थान देण्यात आले नव्हते. त्यामुळे मोठा वाद झाला होता. याबद्दल बोलताना उत्तर प्रदेशमधील भाजपचे आमदार संगीत सोम यांनी वादग्रस्त विधान केले आहे. ‘ताजमहालची उभारणी गद्दारांनी केली आहे. त्यामुळे ताजमहाल भारतीय संस्कृतीवरील कलंक आहे,’ असे संगीत सोम यांनी एका जनसभेला संबोधित करताना म्हटले. त्यांच्या या विधानाला असदुद्दीन ओवैसी यांनी ट्विटरवरुन उत्तर दिले आहे. ‘लाल किल्ल्याची उभारणीदेखील ‘गद्दारां’नी’ केली. मग आता पंतप्रधान मोदी लाल किल्ल्यावरुन ध्वजवंदन करणे बंद करणार का?’ असा प्रश्न त्यांनी विचारला. ‘पंतप्रधान मोदी आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ देशातील आणि देशाबाहेरील पर्यटकांना ताजमहाल पाहायला येऊ नका, असे सांगणार का?, दिल्लीमधील हैदराबाद हाऊसदेखील ‘गद्दारां’नीच उभारले आहे. मग मोदी या ठिकाणी पर्यटकांचा पाहुणचार करणे थांबवणार का?’ अशा प्रश्नांची सरबत्तीच ओवैसी यांनी केली.

ताजमहालला भारतीय संस्कृतीवरील कलंक म्हणणारे भाजप आमदार संगीत सोम सध्या एकटे पडल्याचे चित्र पाहायला मिळते आहे. भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी आणि प्रवक्त्यांनी सोम यांच्या विधानावरुन फारकत घेतली आहे. ‘संगीत सोम यांनी त्यांच्या विधानातून त्यांचे वैयक्तिक मत मांडले आहे,’ असे भाजपचे प्रवक्ते नलिन कोहलींनी म्हटले आहे. ‘ताजमहाल भारताचा सांस्कृतिक वारसा आहे,’ असेही ते म्हणाले.

उत्तर प्रदेश सरकारमध्ये पर्यटनमंत्री असलेल्या रिटा बहुगुणा जोशी यांनीदेखील संगीत सोम यांनी त्यांच्या विधानातून त्यांचे वैयक्तिक विचार मांडल्याचे म्हटले आहे. ‘ताजमहाल आमच्या सांस्कृतिक वारशाचा भाग आहे. मला आणि मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनादेखील असेच वाटते. ताजमहाल देशातील एक मोठे पर्यटनस्थळ आहे. ताजमहाल परिसरातील सुविधांच्या विकासासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. पर्यटनाच्या दृष्टीकोनातून आम्हाला ताजमहालचा अभिमान वाटतो,’ असेही जोशी म्हणाल्या.