scorecardresearch

पुलवामात दहशतवाद्यांच्या हल्ल्यात पोलीस शहीद

जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री आणि ‘नॅशनल कॉन्फरन्स’चे उपाध्यक्ष ओमर अब्दुल्ला यांनी या हल्ल्याचा निषेध केला

पुलवामात दहशतवाद्यांच्या हल्ल्यात पोलीस शहीद
दहशतवाद्यांनी पुलवामाच्या पिंगलना येथे केंद्रीय राखीव पोलीस दल (सीआरपीएफ) आणि पोलिसांच्या संयुक्त पथकावर गोळीबार केला.

श्रीनगर : जम्मू-काश्मीरच्या पुलवामा जिल्ह्यात रविवारी सुरक्षा दलाच्या पथकावर दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात एक पोलीस शहीद झाला, तर केंद्रीय राखीव पोलीस दलाचा एक जवान जखमी झाला. पोलिसांनी ही माहिती दिली. त्यांनी सांगितले की, हल्ल्याची घटना दक्षिण काश्मीर जिल्ह्यातील पिंगलाना भागात घडली. दहशतवाद्यांनी पुलवामाच्या पिंगलना येथे केंद्रीय राखीव पोलीस दल (सीआरपीएफ) आणि पोलिसांच्या संयुक्त पथकावर गोळीबार केला.

पोलीस प्रवक्त्याने सांगितले, की अतिरिक्त सुरक्षा कर्मचारी घटनास्थळी पाठवण्यात आले असून, शोधमोहीम सुरू आहे. शहीद पोलीस कर्मचाऱ्याचे नाव जावेद अहमद दार आहे. जखमी जवानाला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. 

जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री आणि ‘नॅशनल कॉन्फरन्स’चे उपाध्यक्ष ओमर अब्दुल्ला यांनी या हल्ल्याचा निषेध केला. ‘पीपल्स कॉन्फरन्स’नेही या हल्ल्याचा निषेध केला.

शोपियाँमध्ये दहशतवादी ठार

श्रीनगर : जम्मू-काश्मीरच्या शोपियाँ जिल्ह्यात रविवारी सुरक्षा दलांशी झालेल्या चकमकीत लष्कर-ए-तैयबाचा एक दहशतवादी मारला गेला. मृत दहशतवाद्याचे नाव नसीर अहमद भट आहे. तो शोपियाँ जिल्ह्यातील नौपोरा भागातील रहिवासी असल्याचे पोलिसांनी सांगितले. बासकुचन भागात दहशतवादी असल्याची खबर मिळाल्यानंतर सुरक्षा दलांनी शोधमोहीम सुरू केली. ही मोहीम सुरू असताना दहशतवाद्यांनी गोळीबार केला. सुरक्षा दलांनीही प्रत्युत्तर दिले, त्यात ज्यात ‘लष्कर-ए-तैयबा’चा स्थानिक दहशतवादी मारला गेला.

उधमपूर बाँबस्फोटप्रकरणी दोघांना अटक

जम्मू : जम्मू-काश्मीरमधील उधमपूर जिल्ह्यात नुकत्याच झालेल्या बॉम्बस्फोटप्रकरणी दोन जणांना अटक करण्यात आली आहे. जम्मू-काश्मीरमध्ये २८ व २९ सप्टेंबरदरम्यान दोन बसमध्ये स्फोट झाले होते. उधमपूर जिल्ह्यात २८ सप्टेंबर रोजी रात्री साडेदहाला डोमेल चौकातील पेट्रोलपंपाजवळ उभ्या बसमध्ये झालेल्या पहिल्या स्फोटात दोन जण जखमी झाले होते. २९ सप्टेंबर रोजी जुन्या बसस्थानकाजवळ सकाळी सहाच्या सुमारास झालेल्या दुसऱ्या स्फोटात कोणतीही जीवितहानी झाली नाही. बसचे नुकसान झाले होते.

मराठीतील सर्व देश-विदेश ( Desh-videsh ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

संबंधित बातम्या