Corona Virus Update in India : करोना प्रतिबंधक उपाय, लसीकरण यामुळे भारताने करोना संसर्गावर आळा घातला होता. मात्र, आता पुन्हा एकदा करोनाने हातपाय पसरायला सुरुवात केली आहे. गेल्या काही दिवसांपासून करोनाच्या रुग्णसंख्येत सातत्याने वाढ नोंदवली जात असल्याने आरोग्य विभागाकडून चिंता व्यक्त केली जात आहे. त्यातच, गेल्या २४ तासांत देशभरात नव्या ११ हजार १०९ करोना रुग्णांची वाढ झाली आहे.

गेल्या २४ तासांत ११ हजार १०९ करोना रुग्णांची वाढ झाल्याने आता एकूण सक्रिय रुग्णांची संख्या ४९ हजार ६२२ वर गेली आहे. धक्कादायक म्हणजे काल दिवसभरात देशात २० मृतांची नोंद करण्यात आली आहे.

हेही वाचा – करोनाची धास्ती! किती ऑक्सिजन, आयसीयू, व्हेंटिलेटर बेड्स उपलब्ध? केंद्राने दिली महत्त्वपूर्ण माहिती

करोना रुग्णांचा आलेख चढताच

देशभरात करोनाच्या नव्या रुग्णांमध्ये सातत्याने वाढ होत आहे. नव्या रुग्णांचा आलेख चढा राहिला आहे. त्यामुळे करोनाची नवी लाट येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. परंतु, करोना प्रतिबंधक नियमांचं पालन केल्यास संसर्ग टाळता येईल, असंही तज्ज्ञांकडून सांगितलं जात आहे. करोनावर आळा घालण्याकरता केंद्र सरकारकडून नव्याने उपाययोजना आखल्या जात आहेत. बुधवारी देशात सात हजार ८३० नवे रुग्ण सापडले होते. तर, गुरुवारी १० हजार रुग्णांची वाढ नोंदवण्यात आली होती. आज ११ हजार रुग्णांची नोंद झाल्याने देशात करोनाच्या नव्या रुग्णांमध्ये झपाट्याने वाढ होत असल्याचे स्पष्ट होत आहे.

कुठे किती मृत्यू?

छत्तीसगडमध्ये दोन, दिल्लीत तीन, कर्नाटक, केरळ, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, ओदिसा, पुद्दूचेरी, तामिळनाडू, उत्तराखंड, उत्तर प्रदेश येथे प्रत्येकी एक, राजस्थानमध्ये तीन, पंजाबमध्ये दोन मृत्यू करोनामुळे झाले आहेत.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

महाराष्ट्रातील स्थिती काय?

महाराष्ट्रातही गेल्या काही दिवसांपासून करोनाच्या नव्या रुग्णांमध्ये वाढ होत आहे. बुधवारी महाराष्ट्रात करोनाच्या १११५ नव्या रुग्णांची वाढ झाली होती. तर, गुरुवारीही करोनाच्या नव्या रुग्णांचा आकडा हजारपार गेला आहे. गुरुवारी महाराष्ट्रात १ हजार ८६ करोनाचे नवे रुग्ण सापडले. तर, यापैकी मुंबईतील २७४ रुग्ण आहेत. तर, महाराष्ट्रात एका मृत्यूची नोंद झाली आहे. महाराष्ट्रात सध्या ५७०० रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तर मुंबईत १६३५ अॅक्टिव्ह रुग्ण आहेत.