राजधानी दिल्लीत करोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या परिस्थतीवरून, दिल्ली उच्च न्यायालयाने ताशेरे ओढले आहेत. परिस्थिती अधिकच चिंताजनक होत असल्याचे न्यायालयाने म्हटले आहे. शिवाय, बिकट होत चाललेल्या परिस्थितीला आटोक्यात आणण्यासाठी तुमचे काही नियोनज आहे की नाही? असा प्रश्न दिल्ली सरकारला विचारण्यात आला आहे. करोना संर्गाच्यादृष्टीने आज दिल्लीने महाराष्ट्र व केरळला देखील मागे टाकले आहे.

रोजची वाढती संख्या ही विचार करायला लावणारी आहे. दिल्ली सरकारने याबद्दल काय केलं आहे? विशेषतः जेव्हा तुम्ही प्रत्येक प्रकारे अनलॉक करण्याचा निर्णय घेतलेला आहे. ही चिंता केवळ न्यायालय म्हणून नाहीतर नागरिक म्हणून देखील आहे. करोनाबाधितांच्या संख्येने उसळी घेतली आहे. असं न्यायाधीश हिमा कोहली म्हणाल्या आहेत.

आजपर्यंत काय उपाययोजना करण्यात आल्या याबाबत व सणासुदीचा काळ सुरू होत असल्याचं माहित असूनही सर्व नियम का शिथील करण्यात आले? याबाबत आम्हाला अधिकाऱ्यांनी माहिती द्यावी. तसेच, दिल्ली सरकारचं काही धोरण आहे की नाही? हा देखील आम्हाला प्रश्न पडला आहे. असं देखील न्यायालयाने म्हटलं आहे.

तसेच, अन्य राज्यांमध्ये निर्बंध आणले जात आहेत तेव्हा इथं सर्व दरवाजे उघडली जात आहेत. परिस्थितीला कसं हाताळावं हे कुणालाही माहिती नसताना सर्वजण सर्रास वावरत आहेत. दिल्ली सरकारने सर्व गोष्टींकडे दुर्लक्ष का केले? अशा परिस्थितीत एकत्र येण्यास परवानगी दिली नाही पाहिजे. मात्र, निर्बंध घालण्या ऐवजी गर्दी वाढली. यावर कोण नियंत्रण करत आहे? असा प्रश्न देखील न्यायालयाने केला आहे.