करोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारच्या यंत्रणा कसोशीने प्रयत्न करत आहेत. खबरदारीचा उपाय म्हणून बाहेरुन आलेल्या व्यक्तींच्या हातावर स्टॅम्प मारुन त्यांना क्वारंटाईन होण्याचा सल्ला दिला जात आहे. इतर लोकांच्या संपर्कात न येण्यासाठी हे पाऊल उचलण्यात आलेलं आहे. तरीही काही लोकं प्रशासनाचा हा आदेश धुडाकवत प्रवास करत आहेत. तेलंगणा पोलिसांनी नुकतच सिकंदराबाद रेल्वे स्थानकावर क्वारंटाईन केलेल्या एका व्यक्तीला ताब्यात घेतलं आहे.
या व्यक्तीला मुंबईत वैद्यकीय अधिकाऱ्यांनी हातावर स्टॅम्प मारत क्वारंटाईन केलं होतं. या व्यक्तीला ताब्यात घेण्यात आल्यानंतर पोलिसांनी स्थानिक डॉक्टरांच्या मदतीने करोनाची चाचणी घेतली. हा व्यक्ती कतारवरुन मुंबईत आला होता. याआधीही मुंबईत अशा प्रकारच्या घटना समोर आल्या आहेत. खबरदारीचा उपाय म्हणून महाराष्ट्र सरकारने रेल्वे आणि लोकल सेवा बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.
दरम्यान मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनन्स स्थानकावरही पोलिसांनी क्वारंटाईन केलेल्या १५ जणांच्या गटाला ताब्यात घेतलं आहे. ताब्यात घेण्यात आलेल्या व्यक्ती या परदेशातून मुंबईत आल्या होत्या. खबरदारीचा उपाय म्हणून त्यांना क्वारंटाईन केलं होतं, मात्र त्यानंतरही ते घरातून बाहेर पडले. दरम्यान महाराष्ट्रातही काही लोकांना करोनामुळे आपले प्राण गमवावे लागले आहेत. त्यामुळे प्रशासकीय यंत्रणा करोनावर उपाय कधी शोधतात हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.