लॉकडाउन असतानाही आपल्या पुतण्या आणि पुतणीला घेऊन घराबाहेर पडलेल्या व्यक्तीला पोलिसांनी अडवलं असता पाच वर्षाच्या मुलाने त्यांच्यासमोर सगळा भांडाफोड केला. पोलिसांनी व्यक्तीला मुलांना कुठे घेऊन गेला होता असं विचारलं असता मुलानेच पोलिसांनी शिकवणी घेणाऱ्या आपल्या शिक्षिकेची माहिती दिली. इतकंच नाही तर तो पोलिसांना शिक्षिकेच्या घरीही घेऊन गेला. यावेळी शिकवणी घेणारी ही महिला लॉकडाउनच्या नियमांचं सर्रासपणे उल्लंघन करत असल्याचं समोर आलं. यानंतर पोलीस उपअधीक्षक गुरदीप सिंह यांनी महिलेला लॉकडाउनमध्ये शिकवणी घेत असल्याने खडे बोल सुनावले.

या घटनेचा व्हिडीओ शनिवारी सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला. “लोकांना लॉकडाउनमध्ये घरात थांबायला सांगितलं असताना तुम्ही तुमच्या मुलांना शिकवणीसाठी पाठवत आहात. शाळा बंद आहेत मग तुम्ही मुलांना का बाहेर पाठवत आहात?,” अशी विचारणा पोलीस उपअधीक्षक गुरदीप सिंह करत असल्याचं व्हायरल झालेल्या व्हिडीओत दिसत आहे. “आम्ही वारंवार लोकांना घराबाहेर पडू नका असं आवाहन करत असताना तुम्ही तुमच्या मुलांना शिकवणीसाठी पाठवत आहात ?,” असा संतापही पोलीस उपअधीक्षक गुरदीप सिंह यांनी यावेळी व्यक्त केला.

आणखी वाचा- एका लग्नाची गोष्ट! फक्त दोन पाहुणे आणि पाठवणीसाठी चक्क पोलिसांची जिप्सी

पोलीस अधिकाऱ्याने मुलांच्या काकाकडे शिकवणी घेणाऱ्या शिक्षिकेच्या घराचा पत्ता मागितला असता मुलाने लगेच त्यांचं नाव सांगितलं. मुलाचा काका वारंवार त्याला दूर नेण्याचा आणि शांत करण्याचा प्रयत्न करत होता. पण मुलगा वारंवार शिक्षिकेच्या घराकडे बोट दाखवत होता. इतकंच नाही तर मुलगा पोलिसांना घेऊन शिक्षिकेच्या घऱी गेला.

घरी गेल्यानंतर मुलाने शिक्षिकेला हाक मारत बाहेर येण्यास सांगितलं. दरवाजा उघडल्यानंतर समोर पोलिसांना पाहून शिक्षिका घाबरली. धक्का बसलेल्या शिक्षिकेने आपण कोणतीही शिकवणी घेत नसल्याचा दावा केला. पण मुलाने त्या खोटं बोलत असून अजून तीन मुलं शिकवणीसाठी येतात अशी माहिती दिली.

आणखी वाचा- Lockdown : ऑनलाइन Ludo खेळताना पत्नीकडून हरला, चिडलेल्या पतीने मारहाण करत पाठीचा कणा तोडला

यानंतर पोलीस उपअधीक्षक गुरदीप सिंह यांनी शिक्षिकेला खडे बोल सुनावत कोणाच्या परवानगीने शिकवणी घेत आहात अशी विचारणा केली. यावेळी त्यांनी शिक्षिकेला चांगलंच खडसावलं. यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना पोलीस उपअधीक्षक गुरदीप सिंह यांनी मुलांच्या काकाने माफी मागितली असून पुन्हा त्यांना घराबाहेर नेणार नाही असं कबूल केलं असल्याचं सांगितलं.