विवाह हा प्रत्येकाच्या आयुष्यातला एक महत्वाचा दिवस असतो. वधू आणि वर दोघांनी लग्नाची अनेक स्वप्ने पाहिलेली असतात. लग्नाच्या आठवणी या आयुष्यभर सोबत असतात. त्यामुळे या दिवसाला खास बनवण्याचा दोन्ही कुटुंबांचा नेहमीच प्रयत्न असतो. पण सध्या लॉकडाउनमुळे काही विवाहसोहळे पुढे ढकलण्यात आले आहेत तर काही विवाह अत्यंत साध्या पदध्तीने, मोजक्या नातेवाईकांच्या उपस्थितीत पार पडत आहेत. शनिवारी दिल्लीत लॉकडाउनमध्ये असाच एक विवाह पार पडला. या विवाहाला फक्त दोन पाहुणे उपस्थित होते. ते म्हणजे दोन पोलीस अधिकाऱी. त्यांनी आपल्या गाडीतून नवरदेव आणि त्याच्या पालकांना कालकाजी आर्य समाज मंदिर हॉलमध्ये नेऊन सोडले. टाइम्स ऑफ इंडियाने हे वृत्त दिले आहे.

दिल्लीत गोविंदपुरी येथे राहणारा २७ वर्षीय कुशल वालिया पूजासोबत विवाहबद्ध झाला. लॉकडाउनमुळे ब्युटीशियन येऊ शकत नव्हती. त्यामुळे पूजाने स्वत:च आपल्या हातावर मेहेंदी काढली व मेकअप केला. लग्नाच्यादिवशी तिने तिच्या आईची साडी नेसली होती. कुशल आणि पूजाने लग्न करताना सामजिक भानही जपले. लग्नाला उपस्थित असलेल्या मोजक्या मंडळींना तोंडावर मास्क बांधला होता आणि सोशल डिस्टन्सिंगचे पालन करण्यात आले. पोलिसांनी या जोडप्याला भेटवस्तू म्हणून चुन्नी दिली. पोलिसांच्या जिप्सीमधूनच पूजाची सासरी पाठवणी करण्यात आली.

आणखी वाचा- Lockdown : ऑनलाइन Ludo खेळताना पत्नीकडून हरला, चिडलेल्या पतीने मारहाण करत पाठीचा कणा तोडला

“आम्ही आधी विवाह पुढे ढकलण्याचा विचार केला होता. पण नजीकच्या काळात मोठा स्वागत सोहळा शक्य होणार नसल्यामुळे दोन्ही कुटुंबांनी साध्या पद्धतीन लग्न करण्याचा निर्णय घेतला” असे कुशलने सांगितले. “लॉकडाउनमध्ये लग्न करताना पोलिसांची परवानगी आवश्यक होती. माझ्या वडिलांनी पोलिसांशी संपर्क साधल्यानंतर ते मदत करण्यास तयार झाले” असे कुशलने सांगितले.