करोना व्हायरससोबत लढा देताना भारतात चाचणीसाठी योग्य ती सुविधा नसल्याची टीका केली जात होती. मात्र महिला विषाणूतज्ज्ञ मिनल दाखवे-भोसले यांनी दिवसरात्र मेहनत करत भारतातील पहिलं करोना टेस्ट किट तयार केलं आहे. उल्लेखनीय बाब म्हणजे मिनल भोसले या गर्भवती असतानाही करोना टेस्ट किट तयार करण्यासाठी झटत होत्या. करोना टेस्ट किट जन्माला घातल्यानंतर काही तासातच त्यांनी आपल्या बाळाला जन्म दिला. मायलॅब डिस्कव्हरी भारतातील पहिली फार्माकंपनी आहे ज्यांना टेस्ट किटची निर्मिती तसंच विक्री करण्याची परवानगी मिळाली आहे. टेस्ट किट तयार केल्यानंतर पुणे, मुंबई, दिल्ली, गोवा आणि बंगळुरु येथील १५० लॅबना पाठवण्यात आलं आहे.

हे टेस्ट किट तयार करण्यात मायलॅबच्या संशोधन आणि विकास विभागाच्या प्रमुख असणाऱ्या विषाणूतज्ज्ञ मिनल भोसले यांचा मोलाचा वाटा आहे. प्रसुतीच्या काही तास आधीपर्यंत करोना निदानसाठी लागणाऱ्या या किटचं संशोधन त्या करत होत्या. “आमच्या किटच्या सहाय्याने फक्त अडीच तासात निदान होणार आहे. तर याउलट परदेशातून मागवण्यात आलेले किट सहा ते सात तास घेतात,” असं मिनल भोसले यांनी सांगितलं आहे. हे किट रेकॉर्ड टाइममध्ये बनवण्यात आल्याचंही मिनल भोसले सांगतात. हे किट बनवण्यासाठी तीन ते चार महिन्यांचा कालावधी देण्यात आला होता, पण आम्ही फक्त सहा आठवड्यांत हे किट तयार केलं आहे असं त्यांनी सांगितलं.

Rohit Sharma Shared Heart Wrenching Story of Daughter's Birth
लेकीच्या जन्मावेळी रोहित शर्मा पोहोचू शकला नाही, ‘हे’ दोन खेळाडू ठरले कारण; ५ वर्षांनी सांगितला मोठा प्रसंग
IPL 2024 Mumbai Indians vs Chennai Super Kings Match Updates in Marathi
IPL 2024: धोनीच्या वादळी खेळीने आनंद महिंद्राही झाले चकित, माहीचे कौतुक करताना म्हणाले, “कृतज्ञ आहे की माझं नाव Mahi-ndra…”
Pune Police Arrest Nigerian Woman in Mumbai for Mephedrone Smuggling
मेफेड्रोन तस्करी प्रकरणात पुणे पोलिसांची कामगिरी; मुंबईत नायजेरियन महिलेला अटक
Bail
अयोग्य स्पर्श केल्याने महिलेकडून एकाची हत्या; तीन वर्षांचा कारावास भोगल्यानंतर कोर्ट म्हणतं, “स्वसंरक्षणार्थ…”

महत्त्वाचं म्हणजे एकीकडे किट तयार करण्याची डेडलाइन असताना मिनल भोसले दुसऱ्या एका डेडलाइनसोबत लढा देत होत्या. गेल्याच आठवड्यात त्यांनी मुलीला जन्म दिला. फेब्रुवारी महिन्यात त्यांनी किट तयार करण्याचं काम सुरु केलं होतं. त्यांच्या प्रसुतीमध्ये अडचण येईल असं डॉक्टरांनी त्यांना सांगितलं होतं. यानंतर काही वेळातच त्या हॉस्पिटमधून निघाल्या आणि किट तयार करण्याचं काम सुरु केलं होतं.

“आणीबाणीची परिस्थिती असल्याने मी हे आव्हान म्हणून स्वीकारलं. मला माझ्या देशाची सेवा करणं भाग होतं,” अशी भावना मिनल भोसले यांनी व्यक्त केली आहे. पण यामागे आपण एकट्या नसून १० जणांच्या आपल्या टीमने खूप कष्ट घेतलं असल्याचं सांगतात. प्रसूतीच्या एक दिवस आधी म्हणजेच १८ मार्चला मिनल भोसले यांनी आपलं किट मान्यतेसाठी राष्ट्रीय विषाणू संस्थेकडे (नॅशनल इन्स्टिट्युट ऑफ व्हायरॉलॉजी) सोपवलं. त्याच संध्याकाळी रुग्णालयात दाखल होण्याच्या काही तास आधी त्यांनी किटला मान्यता मिळावी यासाठी FDA आणि CDSCO यांच्याकडे प्रस्ताव सोपवला.

“आमच्याकडे वेळ कमी होता. आमच्या प्रतिष्ठा पणाला लागली होती. आम्हाला प्रत्येक गोष्ट पहिल्या प्रयत्नात यशस्वी होईल याची खात्री करायची होती. मिनल या सगळ्या प्रयत्नांचं नेृतृत्व करत होत्या,” असं मायलॅबचे डॉ वानखेडे यांनी सांगितलं आहे. “जर तुम्ही नमुना म्हणून १० किट दिल्या असतील तर त्या सर्वांचा निकाल सारखाच येणं अपेक्षित होतं. आणि आम्हाला त्यात यश मिळालं. आमचे किट अगदी योग्य होते,” असं मिनल यांनी सांगितलं आहे. मायलॅबच्या या किटची किंमत केवळ १२०० रुपये आहे. ही एक किट तब्बल १०० नमुन्यांची चाचणी घेऊ शकते.