राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे वरिष्ठ नेते इंद्रेश कुमार यांनी मंगळवारी एक विधान करताना, देशाला अब्दुल कलाम यांच्यासारख्या देशभक्तांची गरज असून मोहम्मद अली जिनांसारख्या देशद्रोह्यांची गरज नाहीय, असं म्हटलंय. मोहम्मद अली जिनांप्रमाणे विचारसणी असणाऱ्यांवर पूर्णपणे बहिष्कार टाकण्यात यावा अशी मागणीही इंद्रेश कुमार यांनी केलीय. विशाल भारत संस्थान तसेच मुस्लीम महिला फेड्रेशन आणि मुस्लीम राष्ट्रीय मंचाने संयुक्तरित्या आयोजित केलेल्या कार्यक्रमात इंद्रेश कुमार बोलत होते.

हिंदू आणि मुस्लीम बांधवांसमोर भाष्य करताना इंद्रेश कुमार यांनी, “देशाला एकत्र आणणारी कलामांसारखी व्यक्ती सध्या हवीय. जिनांसारखा द्रेशद्रोही देशाला नकोय. हा देश बहादुर शाह जफार, अशरफुल्लाह खान, बेगम हजरत महाल यासारख्या स्वातंत्र्यासाठी लढणाऱ्यांचा हा देश आहे. हा देश कलमांसारख्या शास्त्रज्ञांचा आहे. जिनांसारख्या लोकांची आणि तशी विचारसरणी असणाऱ्यांची देशाला गरज नाही. अशा व्यक्तींवर पूर्णपणे बहिष्कार घातला पाहिजे,” असं म्हटलंय. “जिना आणि मुस्लीम लीगने आपल्या मातृभूमीचे तुकडे केले. त्यांच्यामुळे आपण एकमेकांशी लढतोय. अशा लोकांना चांगलं आणि देशभक्त म्हणणं हे पाप आहे,” असं मत इंद्रेश कुमार यांनी व्यक्त केलंय.

चीनच्या आक्रमक भूमिकेसंदर्भात बोलताना इंद्रेश कुमार यांनी चीनला भारताची जमीन बळकावायची आहे असं सांगतानाच चीनची हेकेखोरी मोडून काढत त्यांना धडा शिकवणाऱ्यांना पाठिंबा देण्याची गरज असल्याचं इंद्रेश कुमार म्हणालेत. “चीनला आपली जमीन बळकवायची आहे. आधीच चीनचा आकार हजारो स्वेअर किलोमीटर इतका आहे. चीनला धडा शिकवणाऱ्यांना आपण पाठिंबा देणं गरजचं आहे. पाकिस्तानच्या हेकेखोरीपासून आपल्याला वाचवणाऱ्यांना आपण पाठिंबा दिला पाहिजे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी भारतातील मुस्लीमांच्या एका हातामध्ये कुराण आणि दुसऱ्या हातात कंप्युटर देण्यासंदर्भातील भूमिका पूर्वीच स्पष्ट केलीय,” असंही इंद्रेश कुमार म्हणाले.

RSS Leader Indresh Kumar (Photo/ANI)
इंद्रेश कुमार (फोटो एएनआयवरुन साभार)

वारणसीमधील या कार्यक्रमामध्ये मुस्लीम महिलांसमोर बोलताना इंद्रेश कुमार यांनी समाजवादी पक्षाच्या कालावधीमध्ये मोठ्या प्रमाणात दंगली झाल्याने अनेक महिला बेघर झाल्याचा आरोपही केला. ज्यांनी मुस्लीम महिलांना तिहेरी तलाखच्या वेडेपणापासून वाचवलं त्यांना पाठिंबा देण्याची गरज आहे, असंही इंद्रेश कुमार म्हणालेत. “महिलांना तिहेरी तलाखच्या वेडेपणातून वाचवणाऱ्यांना पाठिंबा द्या. उत्तर प्रदेशमध्ये समाजवादी पार्टीची सत्ता होती तेव्हा राज्यात वरच्यावर दंगली व्हायच्या. या कालावधीमध्ये मुस्लीम महिला त्यांच्या मुलांसहीत बेघर व्हायच्या. दिवसाढवळ्या समाजकंटकांकडून या महिलांची छेड काढली जायची. तेव्हा त्यांना मदत करणारंही कोणी नव्हतं. आता आपल्याकडे एक सशक्त सरकार आहे. आता राज्यात दंगली होत नाहीत,” असं इंद्रेश कुमार यांनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचं कौतुक करताना म्हटलंय.