करोना व्हायरसचा फैलाव रोखण्यासाठी वेगवेगळया उपायोजना करुनही देशात करोनाची लागण होणाऱ्या रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. हा आजार काहीजणांसाठी जीवघेणा ठरत आहे. मागच्या २४ तासात दर तीन मिनिटांमध्ये दोन जणांचा करोना व्हायरसमुळे मृत्यू झाला आहे. हिंदुस्थान टाइम्सशी संबंधित असलेल्या हिंदुस्थानने केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या डाटाचे विश्लेषण केल्यानंतर ही माहिती समोर आली आहे.

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या माहितीनुसार, मागच्या २४ तासात करोनामुळे ९४१ जणांचा मृत्यू झाला आहे. गेल्या चोवीस तासांत देशात ५७,९८२ नवे करोनाबाधित आढळून आले आहेत. देशातील एकूण रुग्णसंख्या आता २६ लाखांच्या पार पोहोचली आहे. आरोग्य मंत्रालयाच्या डाटानुसार, करोनामुळे मृत्यू होणाऱ्यांची संख्या सोमवारी ५० हजाराच्या पुढे गेली आहे.

१९ लाख १९ हजार ८४३ रुग्ण करोनामधून बरे झाले आहेत. ६ लाख ७६ हजार ९०० अ‍ॅक्टिव्ह रुग्ण आहेत. करोना संक्रमितांच्या संख्येच्या हिशोबानं भारत जगातील तिसरा सर्वाधिक बाधित देश बनला आहे. आयसीएमआरच्या माहितीनुसार, देशात आतापर्यंत तीन कोटीपेक्षा जास्त करोना चाचण्या करण्यात आल्या आहेत. भारतात करोना चाचणीचा वेग वाढवल्यामुळेही रुग्णांची संख्या वाढत आहे. देशात आता दररोज सात लाखाच्या घरात करोना चाचण्या होत आहे. जास्तीत जास्त चाचण्या हा सुद्धा या आजारावर नियंत्रण मिळवण्याचा एकमार्ग आहे.