करोना रुग्णसंख्या नियंत्रणात आल्याने निर्बंध शिथील झाले असतानाच पुन्हा एकदा रुग्णसंख्येत वाढ होऊ लागल्याने चिंतेत भर पडली आहे. रुग्णसंख्या वाढत असल्याने उत्तर प्रदेश सरकारने मास्क अनिवार्य केलं असून लोकांना तशा सूचना दिल्या आहेत. उत्तर प्रदेश सरकारने लखनऊ तसंच एनसीआरमधील सहा जिल्ह्यांमध्ये लोकांना सार्वजनिक ठिकाणी मास्क बंधनकारक असेल अशा सूचना दिल्या आहेत. दुसरीकडे दिल्लीतही रुग्णसंख्या वाढली असल्याने मास्क अनिवार्य करण्यात आलं असून नियम न पाळणाऱ्यांना ५०० रुपये दंड ठोठावण्यात येणार आहे.

रुग्णसंख्येत वाढ होत असल्याने दिल्लीच्या आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने (DDMA) मंगळवारी राजधानीत मास्क घालणं अनिवार्य केलं. मास्कशिवाय सार्वजनिक ठिकाणी फिरताना आढळल्यास त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्यात येईल आणि ५०० रुपये दंड आकारला जाईल असंही सांगण्यात आलं होतं.

दरम्यान उपमुख्यमंत्री मनिष सिसोदिया यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सरकार मास्क न घातल्यास दंडवसुली करण्याचा कोणताही विचार करत नसल्याचं स्पष्ट केलं आहे. यावेळी ते म्हणाले की, “करोना अजून बराच काळ राहणार असल्याने आपल्याला त्याच्यासोबत जगण्याची सवय केली पाहिजे. जर रुग्णसंख्या वाढली तर आम्ही कठोर निर्णय घेऊ”.

“सध्या रुग्णसंख्या कमी असल्याने जास्त चिंता करण्याची गरज नाही. तज्ज्ञ तसंच आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणासोबत आज बैठक होणार असून परिस्थितीची आढावा घेतला जाईल,” असं यावेळी मनिष सिसोदिया यांनी सांगितलं.

दरम्यान दिल्लीतील रुग्णसंख्येत गेल्या २४ तासात २६ टक्क्यांनी वाढ झाल्याचं पहायला मिळालं आहे. पण पॉझिटिव्हिटी रेट ४.४२ टक्क्यांवर घसरला आहे. करोनामुळे मृत्यूची एकही नोंद झालेली नाही.

आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, ६३२ नवे करोना रुग्ण आढळले असून पॉझिटिव्हिटी रेट ४.४२ आहेत. सोमवारी एकूण ५०१ रुग्ण आढळले होते तर पॉझिटिव्हिटी रेट ७.७२ टक्के होता. पण यादरम्यान एकाही मृत्यूची नोंद नाही आहे.