युरोपमध्ये जाण्याच्या तयारीत असणाऱ्या आणि कोविशिल्ड लस घेतलेल्या भारतीयांसमोर मोठं संकट उभं राहिलं आहे. त्याचं कारण म्हणजे भारतात मोठ्या प्रमाणात लसीकरणासाठी वापरल्या जात असलेल्या कोविशिल्ड लसीला युरोपियन युनियनने मंजुरीच दिलेली नाही. त्यामुळे ग्रीन पास मिळणं कठिण झालं असून, भारतातून युरोपातील देशात जाण्यात समस्या निर्माण होणार आहेत. यासंदर्भात सीरम इन्स्टिट्यूटचे सीईओ आदर पुनावाला यांनी दिलासा देण्याचा प्रयत्न केला आहे. तर तिकडे युरोपियन मेडिसिन एजन्सी अर्थात EMA ने कोविशिल्ड लस ग्रीन पास यादीत नसण्याच्या कारणाचा खुलासा केला आहे.

युरोपियन युनियनने ग्रीन पास पद्धती सुरू केली आहे. यात युरोपियन मेडिसिन एजन्सीने (EMA) काही लसींना मंजुरी दिलेली आहे. मंजुरी दिलेली लस घेतलेल्या परदेशी प्रवाशांनाच युरोपमध्ये प्रवेशासाठी आवश्यक असणारा ग्रीन पास दिला जाणार आहे. हा ग्रीन पास मिळाल्यानंतर ती व्यक्ती युरोपातील २७ देशांमध्ये जाऊ शकते. ही ग्रीन पास पद्धती १ जुलैपासून संपूर्ण युरोपात लागू केली जाणार आहे. तर स्पेन, जर्मनी, ग्रीस, पोलंड आदी देशांनी याची अमलबजाणी सुरू केली आहे. दरम्यान, ग्रीन पास मिळवण्यासाठी तयार करण्यात आलेल्या लसीच्या यादीत भारतातील कोविशिल्ड लसीचा समावेशच केलेला नसल्यानं समस्या निर्माण झाली आहे.

युरोपियन मेडिसिन एजन्सी अर्थात EMA ने ग्रीन पास यादीत कोविशिल्ड नसण्याच्या कारणांवर भाष्य केलं. “कोविशिल्ड लस अॅस्ट्राझेनेकाच्याच वॅक्सझेवरियाच्याच फॉर्म्युल्याने तयार करण्यात आलेली असली, तरी कोविशिल्ड लसीला सध्या युरोपातील राष्ट्रांमध्ये परवानगी मिळालेली नाही. उत्पादन होत असलेल्या ठिकाणं वेगळी असल्यानं अंतिम उत्पादनातही फरक असू शकतो” असं युरोपियन मेडिसिन एजन्सीचे माध्यम अधिकारी झाला ग्रु्दनिक यांनी इंडिया टुडे वृत्तवाहिनीला दिलेल्या माहितीत म्हटलं आहे. युरोपियन कायद्यानुसार लसीला परवानगी मिळवण्यासाठी उत्पादन होत असलेल्या ठिकाणीला भेट देऊन लस निर्मिती प्रक्रियेची पाहणी केली जात. लसीला मंजुरी देण्यातील हा महत्त्वाचा भाग आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

आदर पुनावाला काय म्हणालेत?

“ज्या भारतीयांनी कोविशिल्ड लस घेतली आहे, त्यांना युरोपातील देशात प्रवास करण्यासाठी समस्यांचा सामना करावा लागत आहे. लवकरात लवकर हा मुद्दा सोडविला जाईल, अशी ग्वाही मी देतो. यासाठी नियामक (युरोपियन मेडिसिन एजन्सी) आणि राजनैतिक स्तर अशा दोन्ही पातळ्यावर चर्चा केली जाईल,” असं सांगत पुनावाला यांनी लवकरात लवकर हा मु्द्दा निकाली काढण्याचा विश्वास व्यक्त केला आहे.