केव्हिन पीटरसनला ऑस्ट्रेलिया, वेस्ट इंडिजची भीती

लंडन : ईऑन मॉर्गनच्या नेतृत्वाखाली खेळणारा इंग्लंडचा संघ आणि बलाढय़ भारत हेच दोन संघ विश्वचषक विजेतेपदासाठी प्रबळ दावेदार आहेत. मात्र ऑस्ट्रेलिया आणि अनपेक्षित कामगिरी करणाऱ्या वेस्ट इंडिजलाही विश्वचषक उंचावण्याची संधी आहे, असे मत इंग्लंडचा माजी क्रिकेटपटू केव्हिन पीटरसनने व्यक्त केले आहे.

पीटरसनने या वेळी मॉर्गनची स्तुती केली. तो म्हणाला, ‘‘मॉर्गनने चांगल्या प्रकारे इंग्लंडची संघबांधणी केली आहे. काही वर्षांपूर्वी आम्ही इंग्लंड संघ मजबूत करण्याचे स्वप्न ठेवले होते. आता इंग्लंडनेही सकारात्मकतेची कास धरत उल्लेखनीय प्रगती केली आहे. इंग्लंडचे खेळाडू ज्याप्रकारे सध्या खेळताहेत, ते पाहून आनंद होत आहे. अपयशाला न घाबरता त्यांनी आपली जडणघडण केली आहे.’’

चाहत्यांच्या अपेक्षांचे ओझे पेलण्याचे सामथ्र्य इंग्लंडला लाभेल, अशी आशा पीटरसनने व्यक्त केली. ‘‘इंग्लंडच्या चाहत्यांची पसंती अद्यापही कसोटी क्रिकेटलाच असली तरी विश्वचषकालाही भरभरून प्रतिसाद देतील, यात शंकाच नाही. इंग्लंडचा संघ विश्वविजेतेपदाच्या शर्यतीत असला तरी त्यांना घरच्या चाहत्यांच्या दडपणाचा सामना करावा लागणार आहे. इंग्लंडचा संघ चाहत्यांच्या अपेक्षांची पूर्ती करेल, अशी आशा आहे,’’ असेही पीटरसनने सांगितले.