Crime News तंदुरी रोटीवरुन झालेल्या हाणामारी आणि भांडणात ऐन लग्नाच्या मांडवात दोघांचा मृत्यू झाला आहे. लग्न समारंभ म्हटलं की रुसवे फुगवे पाहण्यास मिळतातच. पण एका लग्नात चक्क तंदुरी रोटीवरुन दोघांचं भांडण झालं. ते इतकं विकोपाला गेलं की दोघांचा मृत्यू झाला. माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहचले आणि त्यांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवले.

कुठे घडली ही धक्कादायक घटना?

उत्तर प्रदेशातील अमेठीत एका विवाह सोहळ्यात ही धक्कायक घटना घडली आहे.या भांडणात दोघांचा मृत्यू झाला आहे. तंदुरी रोटी आधी कुणी घ्यायची? या क्षुल्लक कारणावरुन हा वाद झाला, पुढे विकोपाला गेला.होता. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांकडून या प्रकरणाचा तपास केला जात आहे. तर दुसरीकडे लग्नाच्या मांडवात मृत्यूचं तांडव झाल्यामुळे सगळेच दुःखी झाल्याचं पाहण्यास मिळालं.

नेमकं काय झालं?

अमेठीतील जामो ठाणे भागातील बलभद्रपूर गावात ही घटना घडली आहे. या गावात रामजियावन वर्मा यांच्या घरात लग्नसोहळा होता. वराची वरात येईपर्यंत सगळं काही सुरळीत सुरु होतं. सगळे लोक लग्नाची तयारी करत होते. या लग्न सोहळ्यात पाहुण्यांच्या जेवणाला सुरुवात झाली. जेवण बनवणाऱ्यांनी समोर भरपूर साऱ्या तंदुरी रोटी ठेवल्या होत्या. यातील तंदुरी रोटी घेण्यावरून रवी कुमार उर्फ लल्लू आणइ आशिष कुमार यांच्यात भांडण आणि वाद सुरु झाला. दोघांचा हा वाद नंतर एवढा वाढला की दोघांनीही एकमेकांना लठ्याकाठ्यांनी मारहाण करण्यास सुरुवात केली. या मारहाणीत दोघंही गंभीर जखमी झाले. या हाणामारीमुळे मोठ्या प्रमाणावर जखमी झालेल्या आशिष वर्माचा जागेवरच मृत्यू झाला. तर रवीचा लखनऊ येथील रुग्णालयात उपचारांच्या दरम्यान मृत्यू झाला. या दोघांच्या कुटुंबांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

तंदुरी रोटी आधी घेण्यावरुन सुरु झाला वाद

१८ वर्षांचा रवी कुमार उर्फ कल्लू आणि १७ वर्षांचा आशिष कुमार या दोघांमध्ये सुरुवातीला तंदुरी रोटी आधी घेण्यावरुन जरा बाचाबाची झाली. त्यानंतर हा क्षुल्लक वाद इतका विकोपाला गेला की दोघांनी एकमेकांना लाठ्या-काठ्यांनी मारहाण केली. ज्या घरात लग्नाचं वातावरण होतं त्या घरातही या घटनेमुळे शोककळा पसरली.

पोलिसांनी नेमंक काय सांगितलं?

दोन तरुणांचा तंदुरी रोटीवरुन वाद झाला. या घटनेनंतर दोघांनीही एकमेकांनी लाठी-काठीने मारलं. या घटनेत भांडण करणाऱ्या आणि एकमेकांना मारहाण करणाऱ्या दोघांचाही मृत्यू झाला. गौरीगंज सर्कलचे सीओ अखिलेश वर्मा यांनी ही माहिती दिली. इंडिया टुडेने हे वृत्त दिलं आहे.