चीनमधील अनेक संस्था व आस्थापने सायबर दरोडय़ात गुंतल्या असून त्यांनी अमेरिकेतील संस्थांमध्ये सायबर हल्ले केले आहेत याचे पुरावे अमेरिकी अध्यक्ष बराक ओबामा यांनी चीनचे नूतन अध्यक्ष झी जिनपिंग यांच्याबरोबर झालेल्या बैठकीत सादर केले. चीनने असे सायबर दरोडे चालूच ठेवले तर दोन्ही देशांमधील द्विपक्षीय संबंधात तो मोठा अडथळा ठरेल असे एका वरिष्ठ अमेरिकी अधिकाऱ्याने सांगितले.
शुक्रवार व शनिवार असे दोन दिवस उभय नेत्यात दक्षिण कॅलिफोर्निया येथील एका रिसॉर्टमध्ये चर्चा झाली, त्यावेळी ओबामा यांनी चीनच्या अध्यक्षांना खडे बोल सुनावले. दोन्ही दिवस रोज आठ तास जागतिक व द्विपक्षीय प्रश्नांवर चर्चा झाली. झी जिनपिंग यांनी कार्यभार स्वीकारल्यानंतर चार महिन्यातच ही शिखर बैठक झाली असून चीनबरोबरच्या संबंधांचे नवे प्रारूप सादर करण्याचा त्यामागे हेतू होता.
चर्चा सकारात्मक व रचनात्मक स्वरूपाची होती. ती यशस्वी झाली असून उद्दिष्टेही साध्य झाली आहेत. दोन्ही नेत्यांनी मानवी हक्क व लष्करी संबंध याविषयी चर्चा केली. ओबामा यांनी चीनने अमेरिकेतील संस्थांमध्ये घातलेल्या सायबर दरोडय़ाचे पुरावे व उदाहरणे चिनी शिष्टमंडळापुढे ठेवली, चीननेच ही कृत्ये केली आहेत याविषयी आमच्या मनात तीळमात्र शंका नाही असे अमेरिकेने ठणकावून सांगितले असल्याचे डॉनिलन म्हणाले.