पीटीआय, कोलकाता

पश्चिम बंगाल आणि बांगलादेश किनारपट्टी भागात रेमल चक्रीवादळ रविवारी रात्री दाखल झाले. या वादळाची तीव्रता ताशी ११० ते १२० किलोमीटर इतकी होती, अशी माहिती हवामान विभागाने दिली. रात्री साडेआठला बंगालच्या किनारपट्टीपासून सुमारे ३० किमी अंतरावर दाखल झालेल्या ‘रेमल’चा प्रभाव सुमारे चार तास सुरू राहील, असे हवामान खात्याने म्हटले आहे.

पश्चिम बंगाल आणि बांगलादेश किनाऱ्यावर तसेच उत्तर बंगालच्या उपसागरात वादळी वाऱ्याचा वेग ताशी ११० ते १२० किमी होता. त्यानंतर हे वारे ताशी १३५ किमी वेगाने वाहत होते. सहा तासानंतर त्याची तीव्रता कमी होणार असल्याचे हवामान खात्याने म्हटले आहे. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी बैठक घेऊन पूर्वतयारीचा आढावा घेतला. तसेच केंद्रीय गृह विभागाला परिस्थितीवर देखरेख ठेवायला सांगितले.

हेही वाचा >>>पायल कपाडियाची ऐतिहासिक कामगिरी; ‘कान’मध्ये ‘ऑल वी इमॅजिन ॲज लाईट’ला ‘ग्रां प्री’ पुरस्कार

एक लाखाहून अधिक नागरिकांचे स्थलांतर

पश्मिच बंगाल सरकारने किनारपट्टी भागाप्रमाणेच सागर बेट आणि सुंदरबन येथून एक लाखाहून अधिक नागरिकांचे सुरक्षित स्थळी स्थलांतर केले. राज्य आपत्ती व्यवस्थापन आणि राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल (एनडीआरएफ) यांच्या प्रत्येकी १६ तुकड्या किनारी भागात तैनात करण्यात आल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. त्याशिवाय ५.४० लाख ताडपत्रींचे वाटप केले आहे, तसेच रेशन, पावडर दूध आणि पिण्याच्या पाण्याची व्यवस्थाही केली आहे.