D Y Chandrachud : आर.जी. कर रुग्णालयात महिला डॉक्टरवर बलात्कार करण्यात आला, त्यानंतर तिची हत्या करण्यात आली. यानंतर ममता बॅनर्जींनी राजीनामा द्यावा ही मागणी करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयात करण्यात आली. या याचिकेच्या सुनावणी दरम्यान सरन्यायाधीश डी. वाय. चंद्रचूड (D Y Chandrachud) यांनी याचिकाकर्त्याला खडे बोल सुनावले आहेत.

काय म्हणाले सरन्यायाधीश?

“तुम्ही सर्वोच्च न्यायालयात आहात. हा कुठलाही राजकीय मंच नाही. तुम्ही म्हणत आहात की कायदेशीर शिस्तीचं पालन केलं पाहिजे. तुम्ही कुठल्या विशेष राजकीय पदाधिकाऱ्याबाबत काय विचार करता हा आमच्या चिंतेचा विषय नाही. आम्ही डॉक्टरांच्या तक्रारींचं निवारण करत आहोत. जर तुम्ही हे सुचवू इच्छित असाल की मुख्यमंत्री ममता बॅनर्जींनी राजीनामा द्यावा असे निर्देश द्या तर ते काम माझं नाही. न्यायालयाच्या अधिकारांमध्ये ते बसत नाही. तुम्ही जर अशाच प्रकारे वाद सुरु ठेवला तर मी तुम्हाला हाकलून देईन. माझं ऐकून घ्या अन्यथा तुम्हाला कोर्टाबाहेर काढण्याशिवाय काही पर्याय उरणार नाही.” असं म्हणत चंद्रचूड (D Y Chandrachud) यांनी याचिकाकर्त्या वकिलाला खडे बोल सुनावले. लाईव्ह लॉने हे वृत्त दिलं आहे.

ममता सरकारलाही न्यायालयाने सुनावले खडे बोल

D Y Chandrachud दरम्यान कोलकाता येथील रुग्णालयात ९ ऑगस्टला एका महिला डॉक्टरवर बलात्कार करुन तिची हत्या करण्यात आली. या प्रकरणानंतर १९ ऑगस्टला ममता सरकारने असे निर्देश दिले की महिला डॉक्टरांना नाईट शिफ्ट देऊ नये. या संदर्भातलं पत्रक सरकारने काढलं. त्याबाबतच्या याचिकेवरुन सर्वोच्च न्यायालयाने ममता सरकारलाही सुनावलं.

काय म्हटलं आहे सर्वोच्च न्यायालयाने?

सरकार म्हणून आर.जी. कर रुग्णालयातील प्रकारानंतर तुम्ही काय केलं? तर एक पत्रक काढलं आणि त्यात उल्लेख केला की महिला डॉक्टरांना नाईट शिफ्ट लावली जाऊ नये. आमचा हा सवाल आहे की महिला डॉक्टर नाईट शिफ्ट करु नये असं कसं काय तुम्ही म्हणू शकता? महिला डॉक्टरांची सुरक्षा वाढवणं, त्यांच्या सुरक्षेची जबाबदारी अधिक सजगपणे घेणं हे तुमचं काम नाही का? सरन्यायाधीश डी. वाय. चंद्रचूड (D Y Chandrachud) यांनी हा सवाल केला आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

कपिल सिब्बल यांना करण्यात आला सवाल

वरिष्ठ वकील कपिल सिब्बल यांनी पश्चिम बंगालची बाजू मांडली. त्यांना उद्देशून चंद्रचूड म्हणाले, “कपिल सिब्बल तुम्ही या मुद्द्याकडे लक्ष दिलं पाहिजे. पश्चिम बंगाल सरकारने अशी काही घटना रुग्णालयात घडल्यानंतर महिला डॉक्टरांची सुरक्षा वाढवली पाहिजे. तसंच एरवीही महिला डॉक्टरांना सुरक्षित वाटलंही पाहिजे. तुम्ही असं कसं काय म्हणता की महिला डॉक्टर नाईट ड्युटी करणार नाहीत? महिला सगळ्या क्षेत्रात आहेत वैमानिक आहेत, लष्करात आहेत त्या नाईट शिफ्ट करतात असं न्यायालयाने म्हटलं. यानंतर कपिल सिब्बल यांनी आश्वासन दिलं की या प्रकारचा आदेश रद्द करण्यात येईल.