केरळची राजधानी तिरुअनंतपुरमच्या ग्रामीण परिसरात एका दलित अल्पवयीन मुलीचे दोन महिन्यांपेक्षा अधिक काळ शारीरिक शोषण झाल्याची घटना समोर आली आहे. पोलिसांनी आत्तापर्यंत या प्रकरणी सात जणांना अटक केली असून, इतर आरोपींचा शोध घेत आहेत. पोलिसांत दिलेल्या तक्रारीनुसार, दोन महिन्यांपूर्वी दोन आरोपींनी या मुलीवर बलात्कार करून मोबाईलवर त्याचा व्हिडिओ बनवला होता. तेव्हापासून ते दोघे आणि त्यांचे अन्य साथीदार या व्हिडिओच्या आधारे तिला ब्लॅकमेल करून तिचे शारीरिक शोषण करत होते.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जवळपास दोन महिन्यांपूर्वी आरोपींपैकी एक तरुण शोषित मुलीच्या भावाच्या संपर्कात आला होता. तुझा भाऊ दारू पिऊन दारूच्या गुत्त्यावर पडला असल्याचे एक दिवस या मुलाने त्या मुलीस सांगितले. ती आपल्या भावाला आणायला गेल्यावर निर्जन परिसरात दोन तरुणांनी तिच्यावर बलात्कार करून त्याचा व्हिडिओ बनवला. हा व्हिडिओ सोशल मीडियावर अपलोड करण्याची धमकी देत पुढील कित्येक आठवडे अनेकांनी तिच्यावर बलात्कार केला. ३१ मार्च रोजी आरोपींनी त्या मुलीस पारीपपली येथे येण्यास सांगितले. तेथे पोहोचल्यावर रिक्षेतून काही मुले त्या ठिकाणी आलेली पाहाताच त्यांच्याबरोबर जाण्यास तिने नकार दिला. चिडलेल्या मुलांनी तिच्यावर हल्ला केला. जवळपासच्या काही लोकांनी हा प्रकार पाहताच स्थानिक पोलिसांना या बाबत माहिती दिली. पोलीस घटनास्थळी पोहोचल्यावर चौकशीअंती हा सर्व प्रकार उघड झाला. या प्रकरणात किती जणांचा सहभाग आहे ते मुख्य आरोपीला अटक केल्यावरच सांगता येणार असल्याचे पोलीस म्हणाले.