आमिर खानच्या ‘दंगल’ चित्रपटात भूमिका साकारणारी अभिनेत्री सुहानी भटनागर हिचं १६ फेब्रुवारीला १९ व्या वर्षी दिल्लीत निधन झालं. अवध्या १९ व्या वर्षी सुहानीचे निधन झाल्यामुळे सिनेक्षेत्रातून हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. काही दिवसांपूर्वी सुहानीच्या वडिलांनी तिच्या आजाराबाबत सांगितले होते. तिला ‘डरमॅटोमायोसायटिस’ नावाचा दुर्मिळ आजार जडला होता. याच आजारामुळे तिचे अवध्या १९ व्या वर्षी निधन झाले. दरम्यान, हा दुर्मिळ आजार नेमका काय आहे? आजाराची लक्षणं काय आहेत? असे विचारले जात आहे.
सुहानीच्या वडिलांनी काय सांगितले होते?
दोन महिन्यांपूर्वी सुहानीच्या वडिलांनी तिला डरमॅटोमायोसायटिस हा आजार जडल्याचे सांगितले होते. सुरुवातीला सुहानीचा हात सुजला होता. त्यानंतर तिच्या संपूर्ण शरीराला सूज आली होती. पुढे बराच काळ या आजाराचे निदान झाले नाही. त्यानंतर ११ दिवसांपूर्वी सुहानीला एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. या रुग्णालयात उपचार करताना तिला डरमॅटोमायोसायटिस हा आजार झाल्याचे समोर आले होते.
हळुहळू फुफ्फुस कमकुवत
उपचारादरम्यान सुहानीला स्टिरॉईड्स देण्यात आले. यामुळे तिची प्रतिकारशक्ती अधिकच कमकुवत झाली. तिच्या फुफ्फुसावर परिणाम झाला. हळूहळू तिचे फुफ्फुसही कमकुवत होऊ लागले. ज्यामुळे तिला श्वास घेण्यास त्रास होत होता. यातच तिचे निधन झाले.
डरमॅटोमायोसायटिस म्हणजे काय?
डरमॅटोमायोसायटिस हा दुर्मिळ प्रकारात मोडणारा आजार आहे. या आजारात स्नायू कमकुवत होतात आणि त्वचेवर पुरळ येतात. जगभरात अगदी कमी लोकांना हा आजार होतो. या आजाराचे नेमके कारण अद्याप समजू शकलेले नाही. मात्र ऑटोइम्यून आजार आणि या आजारात बरेच साम्य आहे. ऑटोइम्यून आजारात रोगप्रतिकारशक्ती शरीरातील टिश्यूंवर (उती) हल्ला होतो. ज्यामुळे शरीर कमकुवत होते. अनुवांशिकता तसेच काही घटकांच्या संपर्कात आल्यामुळे डरमॅटोमायोसायटिस हा आजार होऊ शकतो. एखाद्या व्यक्तीमधील अनुवांशिक गुणधर्म आणि बाहेरील वातावरणाच्या घटकांमुळे हा आजार डोके वर काढू शकतो.
या आजाराची लक्षणं काय?
या आजाराची वेगवेगळी लक्षणं आहेत. यामध्ये स्नायू कमकुवत होणे, त्वचेवर पुर येणे, सांधेदुखी, अन्न गिळण्यास त्रास होणे अशी काही लक्षणं दिसू शकतात. या आजारात स्नायू आणि त्वचेवर सोबतच परिणाम पडतो. त्यामुळे त्याचे नेमके निदान करण्यास अनेकदा अडचणी येतात.
या आजारावर उपचार काय?
डरमॅटोमायोसायटिस या आजारावर नेमका उपचार उपलब्ध नाही. मात्र वेगवेगळ्या औषधांच्या मदतीने लक्षणं कमी करण्याचा प्रयत्न करता येतो. डरमॅटोमायोसायटिस झालेल्या रुग्णाला इम्यूनोसप्रेसिव्ह औषध दिले जाते. तसेच फिजिकल थेरेपी, इंन्ट्राव्हेनस इम्यूनोग्लोबुलीन थेरेपी अशा वेगवेगळ्या पद्धतीने उपचार केले जातात.