पीटीआय, दार्जिलिंग/काठमांडू
पश्चिम बंगालमधील दार्जिलिंगसह पूर्व नेपाळच्या विविध भागांत रविवारी मुसळधार पावसामुळे झालेल्या भूस्खलनात ६९ हून अधिक जणांचा मृत्यू झाला. मोठ्या संख्येने नागरिक ढिगाऱ्यांखाली अडकल्याने मृत्यूचा आकडा वाढण्याची भीती आहे. स्थानिक प्रशासनांच्या वतीने तत्काळ बचावकार्य हाती घेण्यात आले. दरम्यान, पावसामुळे नागरिकांची घरे वाहून जाण्याबरोबरच रस्ते उद्ध्वस्त झाले असून, दोन्ही ठिकाणी शेकडो पर्यटक अडकल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.

राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल (एनडीआरएफ) आणि जिल्हा प्रशासनांच्या अहवालांनुसार दार्जिलिंग जिल्ह्यातील सारसली, जसबीरगाव, मिरिक बस्ती, धार गाव (मेची), नगरकाटा आणि मिरिक तलाव परिसरात अनेक ठिकाणी भूस्खलनाच्या घटना घडल्या. भूस्खलनात सर्वाधिक प्रभावित झालेल्या मिरिकमध्ये किमान ११ जणांचा मृत्यू झाला, तसेच सात जणांना ढिगाऱ्यांतून बाहेर काढण्यात यश आले. दार्जिलिंगमध्ये ७ जणांचा मृत्यू झाला असून, अनेक जण ढिगाऱ्याखाली अडकले आहेत. आपत्ती व्यवस्थापक पथक, स्थानिक प्रशासन आणि पोलिसांकडून नागरिकांचे बचावकार्य सुरू असल्याचे दार्जिलिंगच्या उपविभागीय अधिकारी (एसडीओ) रिचर्ड लेप्चा यांनी सांगितले.

दार्जिलिंग परिसरात शनिवारपासून मुसळधार पावसाला सुरुवात झाली. रविवारीही पावसाची तीव्रता कायम होती. कोलकाता आणि बंगालच्या इतर भागातील अनेक कुटुंबे मिरिक, घूम आणि लेपचाजगतसारख्या लोकप्रिय ठिकाणी दुर्गा पूजा आणि पूजेनंतरच्या उत्सवांत सहभागी होण्यासाठी दाखल झाले होते, परंतु शेकडो पर्यटक भूस्खलन झाल्यामुळे अडकून पडले आहेत. जिल्ह्यातील धारगाव, नगरकाटा येथे ढिगाऱ्याखाली अडकलेल्या किमान ४० जणांना वाचवण्यात आले. या भागात अनेक घरे उद्ध्वस्त झाली आहेत.

दार्जिलिंग जिल्हा आणि उत्तर सिक्कीमला जोडणाऱ्या मार्गावरील भूस्खलनामुळे विस्कळीत झाली आहे. तसेच सिलिगुडीला मिरिक-दार्जिलिंग मार्गाशी जोडणारा लोखंडी पुलाचेही पावसामुळे नुकसान झाले असून, येथील संपर्क तुटला असल्याचे ‘एनडीआरएफ’तर्फे सांगण्यात आले. भारतीय हवामान विभागाने (आयएमडी) दार्जिलिंग आणि कालिम्पोंगसह पश्चिम बंगालमध्ये ६ ऑक्टोबरपर्यंत अतिवृष्टीचा इशारा जारी केला आहे.

पंतप्रधानांकडून शोक, बॅनर्जींचा आज दौरा

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घटनेतील जीवितहानीबद्दल शोक व्यक्त केला, तसेच दार्जिलिंग आणि आसपासच्या भागातील परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवले जात असल्याचे सांगितले. मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी पीडितांना भरपाईची घोषणा केली. तसेच परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी सोमवार, ६ ऑक्टोबर रोजी घटनास्थळांना भेट देणार आहेत. तसेच विविध ठिकाणी अडकलेल्या पर्यटकांनी घाबरू नये, त्यांना सुरक्षितपणे परत आणण्याची व्यवस्था केली जाईल, असे ममता बॅनर्जी यांनी सांगितले.

नेपाळलाही मुसळधार पावसाचा तडाखा

  • दार्जिलिंगसह पूर्व नेपाळच्या विविध भागांत शनिवारी रात्रीपासून कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे झालेल्या भूस्खलनात आणि पुरामुळे ५१ हून अधिक जणांचा मृत्यू झाल्याचे सशस्त्र पोलीस दलाच्या अधिकाऱ्याने सांगितले.
  • नेपाळच्या कोशी प्रांतातील इलाम जिल्ह्यातील विविध ठिकाणी तब्बल ४० जणांचा मृत्यू झाला. रसुवा जिल्ह्यातील लांगटांग संवर्धन क्षेत्रात नदीच्या प्रवाहात वाहून गेल्याने किमान चार जण तर इलाम, बारा आणि काठमांडू येथे आलेल्या पुरात प्रत्येकी एक जण बेपत्ता आहे.
  • लांगटांग परिसरात ‘ट्रेकिंग’साठी गेेलेल्या १६ पैकी चार जण बेपत्ता आहेत, असे सशस्त्र पोलीस दलाचे (एपीएफ) प्रवक्ते कालिदास धौबाजी यांनी सांगितले. दरम्यान, नेपाळ लष्कर, पोलीस आणि ‘एपीएफ’चे जवान युद्धपातळीवर बचावकार्य करीत आहेत.