Children Mobile Usage Effects: लहान मुलांवर मोबाईलच्या अतीवापराचा किंवा मोबाइलचं व्यसन जडल्याचा वाईट परिणाम होत असल्याची चर्चा सातत्याने ऐकायला मिळते. त्यासंदर्भात वैद्यकीय क्षेत्रातून वा मानसोपचार तज्ज्ञांकडूनही वारंवार भूमिका मांडल्या जातात. याचसंदर्भात लहान मुलांवरील मोबाईल वापराच्या संभाव्य दुष्परिणामांना आळा घालण्यासाठी दाऊदी बोहरा समाजानं १५ वर्षांखालील मुलांच्या मोबाईल वापरावर निर्बंध घातले आहेत. शाळा व समुदायाच्या गटांमध्ये यासंदर्भात जनजागृती करण्यासाठी कार्यशाळा व सेमिनार्स घेतले जात असल्याचं पुणे मिररनं दिलेल्या वृत्तात नमूद केलं आहे.

दाऊदी बोहरा समाजाकडून जागतिक स्तरावर अशा प्रकारचे प्रयत्न केले जात असल्याचं या वृत्तात म्हटलं आहे. मोबाईलच्या अतिवापराचा लहान मुलांच्या मानसिक आरोग्यावर, शारिरीक हालचालींवर परिणाम होत असल्याची बाब अधोरेखित करत ती टाळण्यासाठी समाजाकडून अनेक उपक्रम केले जात आहेत. यासंदर्भात डॉक्टर्स, मानसोपचारतज्ज्ञ यांच्या कार्यशाळाही आयोजित केल्या जात आहेत.

मुलांच्या मानसिकतेवर परिणाम

मोबाईलचा अतीवापर किंवा मोबाइल हाताळण्याचं व्यसन लागल्यास मुलांच्या मानसिक वाढीवर त्याचा विपरीत परिणाम होऊ शकतो. त्यामुळे लहान मुलांना त्यांच्या मानसिक विकासाच्या अवस्थेमध्ये मोबाईल दिला जाऊ नये, असा सल्ला अनेक डॉक्टर्स आणि मानसोपचार तज्ज्ञ देतात. याशिवाय, मोबाईलच्या माध्यमातून सोशल मिडिया आणि इतर ऑनलाईन प्लॅटफॉर्म्सचा वापर मुलांमध्ये वाढू लागला आहे. त्यातून सायबरबुलिंग,ऑनलाईन फसवणूक, आक्षेपार्ह मजकूर सहज उपलब्ध होणे असे प्रकार घडू लागले आहेत. मुलं फसवणुकीच्या प्रकारांमध्ये अडकून मोठं नुकसान करून घेऊ शकतात, अशीही भूमिका समाजाकडून मांडली जात आहे.

आठ वर्षं सुनावणी, वर्षभराची प्रतीक्षा..अखेर दाऊदी बोहरा उत्तराधिकारी वादावर न्यायालयाचा मोठा निकाल!

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मुलांना वाचन, मैदानी खेळ आणि कुटुंबासमवेत अधिकाधिक वेळ घालवण्यासाठीची संधी या गोष्टी करता याव्यात आणि त्यातून त्यांचा मानसिक विकास व्हावा हा यामागचा उद्देश असल्याचं समाजाकडून स्पष्ट करण्यात आलं आहे. तसेच, मोबाईल वापर कमी करण्यासंदर्भात सर्वच वयोगटांसाठी मार्गदर्शक सूचना असल्या तरी निर्बंध १५ वर्षांखालील मुलांसाठीच लागू असतील कारण या वयात मुलांना योग्य काय किंवा अयोग्य काय याचं आकलन नसतं, अशी समाजाची भूमिका असल्याचं या वृत्तात नमूद करण्यात आलं आहे.