पोलिसांविरोधात धरणे आंदोलन करत दिल्लीतील ‘आम आदमी’लाच वेठीस धरणाऱ्या आम आदमी पक्षाच्या सरकारने शनिवारी टीकेचा रोख प्रसारमाध्यमांकडे वळवला. मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी प्रजासत्ताकदिनाच्या पूर्वसंध्येला येथील छत्रसाल स्टेडियवर झालेल्या संचलनाला संबोधित करताना प्रसारमाध्यमांवरच टीका केली. केजरीवाल यांचे वादग्रस्त सहकारी व कायदामंत्री सोमनाथ भारती यांनी तर प्रश्न विचारणाऱ्या पत्रकारांना नरेंद्र मोदींनीच पैसे दिल्याचा आरोप केला.
पोलिसांविरोधात केलेले धरणे आंदोलन घटनात्मक चौकटीतच होते असा दावा करत केजरीवाल यांनी आपण कोणतेही घटनाबाह्य़ कृत्य केले नसल्याचे सांगितले. ‘आप’वर टीका करणाऱ्या प्रसारमाध्यमांनाही त्यांनी लक्ष्य केले. प्रत्येक वृत्तपत्र कोणत्या ना कोणत्या राजकीय पक्षाच्या दावणीला बांधले गेले आहे, त्यामुळेच त्या वृत्तपत्रांच्या मालकांच्या सांगण्यानुसारच पत्रकार आपल्यावर टीका करत असल्याचा आरोप केजरीवाल यांनी यावेळी केला.
भारती यांचा आरोप आणि माफी
दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून सातत्याने टीकेच्या केंद्रस्थानी असलेले कायदामंत्री सोमनाथ भारती पत्रकारांवर घसरले. त्यांना प्रश्न विचारणाऱ्या पत्रकारांवर डाफरताना ‘तुम्हाला नरेंद्र मोदींनी पैसे दिले आहेत का?’,  असा सवाल करत नवा वाद ओढवून घेतला. टीका होऊ लागताच भारती यांनी केलेल्या वक्तव्याबाबत पत्रकारांची माफी मागितली. दिल्ली महिला आयोगाच्या अध्यक्षा बरखासिंह यांच्यावरही त्यांनी टीका केली. त्या काँग्रेसच्या नेत्या असताना आयोगाच्या अध्यक्षपदी असून त्यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी भारती यांनी केली. मात्र, बरखा यांनी भारती यांचे आरोप फेटाळून लावत अध्यक्षपदाचा राजीनामा देण्यास नकार दिला.