नवी दिल्ली : पहलगाम हल्ल्यामागे पाकिस्तानचाच हात असल्याचे भारताने गुरुवारी प्रथमच नावानिशी स्पष्टपणे सांगितले. संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी अमेरिकेचे समपदस्थ पिट हेगसेथ यांच्याशी दूरध्वनीद्वारे चर्चा केली. यावेळी दहशतवादी संघटनांना खतपाणी, प्रशिक्षण आणि अर्थपुरवठ्याचा पाकिस्तानचा इतिहास असल्याचे सिंह म्हणाले. हेगसेथ यांनीही दहशतवादविरोधी लढ्याला अमेरिकेचा भक्कम पाठिंबा असल्याचे स्पष्ट केले.
सिंह आणि हेगसेथ यांच्यात सविस्तर संवाद झाल्याची माहिती संरक्षण मंत्रालयाने दिली आहे. यावेळी सिंह यांनी थेट पाकिस्तानचे नाव घेत दहशतवादविरोधी लढाईत अमेरिकेने स्पष्टपणे भारताचे समर्थन केले पाहिजे, असे आवाहन केले. एखाद्या वरिष्ठ मंत्र्याने पहलगाम हल्ल्याच्या संदर्भात पाकिस्तानचे नाव घेण्याची ही पहिलीच वेळ आहे.
दहशतवादाला खतपाणी घालणाऱ्यांना धडा शिकविण्याचा इशारा आजवर अनेक नेत्यांनी दिला असला, तरी पाकिस्तानचे थेट नाव घेतले नव्हते. चर्चेदरम्यान अमेरिका ठामपणे भारताच्या पाठीशी उभा असल्याचे आश्वासन हेगसेथ यांनी दिल्याची माहिती संरक्षण मंत्रालयाने ‘एक्स’ समाजमाध्यावर दिली. भारताच्या स्वसंरक्षणाच्या अधिकाराला आणि दहशतवादाविरुद्धच्या लढाईला अमेरिकेचा पाठिंबा असून आपला देश भारताबरोबर एकजुटीने उभा असल्याची ग्वाही हेगसेथ यांनी दिली.