Puneet Khurana Suicide Case: दिल्लीतील प्रसिद्ध बेकरी व्यावसायिकाने पत्नीशी चालू असलेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर आत्महत्या केली आहे. दिल्लीच्या कल्याण विहार परिसरातील मॉडेल टाऊन येथील एका घरात पुनीत खुराना (३९) यांनी गळफास घेऊन स्वतःचे आयुष्य संपवले. पुनीत आणि त्यांची पत्नी हे बेकरी व्यावसायातील भागीदार होते. गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यात घटस्फोटाची प्रक्रिया सुरू होती. यातच काल ३१ डिसेंबर रोजी त्यांच्यात वाद झाल्यानंतर पुनीत यांनी टोकाचे पाऊल उचलले. काही दिवसांपूर्वीच बंगळुरू येथे अतुल सुभाष यांनी पत्नीबरोबर चाललेल्या वादानंतर आत्महत्या केली होती. आता त्याच प्रकारची पुनरावृत्ती येथे दिसत आहे.

खुराना कुटुंबियांनी दिलेल्या माहितीनुसार, पुनीत गेल्या काही काळापासून तणावात होते. २०१६ साली लग्न झाल्यानंतर पुनीत आणि त्यांच्या पत्नीने एक बेकरी सुरू केली होती. तसेच काही महिन्यांपूर्वी त्यांनी एका कॅफेचीही सुरुवात केली होती. आत्महत्या करण्यापूर्वी पुनीत यांनी ३१ डिसेंबरच्या रात्री पत्नीशी फोनवरून शेवटचे संभाषण केले होते. बेकरी व्यवसायाबाबत दोघांमध्ये चर्चा झाल्याची माहिती मिळत आहे.

हे वाचा >> Atul Subhash Suicide: अतुल सुभाष यांच्या सुसाइड नोटमध्ये अनेक धक्कादायक दावे, शेवटच्या १२ इच्छा व्यक्त करताना न्यायव्यवस्थेवर केली टीका

पुनीत यांच्या कुटुंबियांनी आरोप केला की, पत्नीने फोनवरील संभाषण रेकॉर्ड करून तिच्या नातेवाईकांना पाठवले. त्यामुळे तणावात गेलेल्या पुनीतने आत्महत्या केली. यानंतर पोलिसांनी पुनीत खुराना यांचा फोन जप्त केला असून ते पत्नीचीही चौकशी करणार आहेत. दरम्यान पुनीत यांच्या आईने सांगितले की, माझ्या मुलाचा पत्नीकडून छळ झाला. व्यवसायातील व्यवहारातून ती त्याला त्रास देत होती. तर पुनीत यांच्या बहिणीने दिलेल्या माहितीनुसार, ३० डिसेंबर रोजी घटस्फोटावर जवळपास दोघांनीही सहमती दर्शवली होती. मात्र दरम्यान दोघांमध्ये काहीतरी कारणावरून पुन्हा वाद झाला, त्यानंतर भावाने टोकाचे पाऊल उचलले.

“पुनीतची पत्नी त्याला त्रास देत होती. तू फट्टू आहेस, मरत का नाहीस? असे टोमणे मारून माझ्या भावाचा छळ केला जात होता. त्याच्याकडून त्याचा ईमेल आयडी मागितला आणि नंतर त्याचे इन्स्टाग्राम अकाऊंट हॅक केले. आत्महत्या करण्यापूर्वी माझ्या भावाने व्हिडीओ रेकॉर्ड केलेला आहे. पण पोलिसांनी आम्हाला तो व्हिडीओ दिलेला नाही”, असाही आरोप पुनीत यांच्या बहिणीने केला.

Atul Subhash suicide case
अतुल सुभाष यांच्या आत्महत्या प्रकरणात त्यांची पत्नी आणि कुटुंबियांना अटक.

अतुल सुभाष प्रकरण काय होते?

बंगळुरूमध्ये ऑटोमोबाइल कंपनीत वरिष्ठ पदावर काम करणाऱ्या ३४ वर्षीय अतुल सुभाष यांनी पत्नी आणि सासरच्या लोकांच्या त्रासाला कंटाळून ९ डिसेंबर रोजी आत्महत्या केली होती. आत्महत्या करण्यापूर्वी त्यांनी ८१ मिनिटांचा व्हिडीओ रेकॉर्ड केला आणि२४ पानांची सुसाइड नोट लिहिली. अतुल सुभाष यांच्यावर त्यांच्या पत्नीने नऊ गुन्हे दाखल केले होते.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी त्यांची पत्नी निकिता सिंघानिया आणि तिच्या कुटुंबियावर अतुल सुभाष यांच्या भावाने दिलेल्या तक्रारीनंतर गुन्हा दाखल झाला. अतुल यांच्यावरील गुन्हे मागे घेण्यासाठी पत्नीने तीन कोटी आणि मुलाला भेटू देण्यासाठी तीस लाख रुपयांची मागणी केली होती, असा आरोप अतुल सुभाष यांच्या भावाने केला होता.