Delhi Digital Arrest Fraud : ऑनलाईन फसवणुकीच्या घटनांमध्ये सध्याच्या काळात मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याचं पहायला मिळत आहे. सामान्य माणसांपासून ते सुशिक्षित व्यक्तींपर्यंत अनेकांची सायबर गुन्हेगारांकडून फसवणूक होत असल्याच्या घटना सातत्याने उघडकीस येत आहेत. आता दिल्लीतील एका माजी बँकरची तब्बल २२.९२ कोटींची फसवणूक झाल्याचं प्रकरण समोर आलं आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. ईडी-सीबीआयचे अधिकारी असल्याचं भासवलं आणि माजी बँकरची २२.९२ कोटींची फसवणूक केली.

सायबर गुन्हेगारांनी कशी केली फसवणूक?

दक्षिण दिल्लीतील गुलमोहर पार्क भागात राहणार्‍या ७८ वर्षीय निवृत्त बँक अधिकार्‍याची फसवणूक करण्यात आली आहे. या गुन्ह्यात सायबर गुन्हेगारांनी या निवृत्त बँक अधिकार्‍याला तब्बल एक महिनाभर डिजिटल अरेस्ट केलं होतं आणि त्यांनंतर बचत खात्यातील रक्कम उकळली. या संदर्भातील वृत्त द इंडियन एक्सप्रेसने दिलं आहे.

झालं असं की, निवृत्त बँकर नरेश मल्होत्रा हे सहा आठवड्यांपासून त्यांच्या मित्र, कुटुंब आणि शेजाऱ्यांना सर्वसामान्य वाटत नव्हते. त्यांच्या चेहऱ्यावर कायम तणाव जाणवत होता. याच काळात त्यांनी काही बँकांच्या शाखांना भेटी दिल्या. या दरम्यान २१ व्यवहारांमध्ये एकूण २२.९२ कोटी रुपये १६ वेगवेगळ्या बँक खात्यांमध्ये हस्तांतरित करण्यात आले. ज्या बँकेंच्या शाखांमधून एवढे पैसे हस्तांतरित करण्यात आले, त्या बँकेच्या शाखा व्यवस्थापकांना कोणताही संशय आला नाही हे विशेष.

हे निवृत्त बँकर अधिकारी प्रत्येक बँकेच्या शाखेत पैसे काढताना बँकेच्या बाहेर एक कप चहा घेत असत. मात्र, या फसवणुकीबाबत ते कोणालाही काहीही बोलले नाहीत, कारण त्यांना डिजिटल अरेस्ट केलं होतं. सायबर गुन्हेगारांनी त्यांना कधी ईडी तर कधी सीबीआयचे अधिकारी कधी मुंबई पोलिसांचे अधिकारी असल्याचं भासवलं होतं. दरम्यान, या संपूर्ण प्रकरणाबाबत मल्होत्रा यांनी ​​द इंडियन एक्सप्रेसशी बोलताना म्हटलं की, “मला असं वाटतं की मी वेडा झालो आहे आणि माझ्या सर्व संवेदना हरवल्या आहेत. माझी विचार करण्याची क्षमता पूर्णपणे घोटाळेबाजांनी ताब्यात घेतली होती.”

सहा आठवड्यांनी केली तक्रार

या निवृत्त बँक अधिकाऱ्याची २२.९२ कोटी रुपयांची फसवणूक होत असताना तक्रार करण्याची हिंमत देखील होत नव्हती. मात्र, त्यानंतर अखेर १९ सप्टेंबर रोजी त्यांनी तक्रार दाखल केली आणि त्याच दिवशी एफआयआर दाखल करण्यात आला. त्यानंतर आता या फसवणुकीच्या प्रकरणात दिल्ली पोलीस सायबर गुन्हेगारांचा शोध घेत आहेत.

दिल्ली पोलिसांच्या इंटेलिजन्स फ्यूजन अँड स्ट्रॅटेजिक ऑपरेशन्स शाखेचे आयुक्त रजनीश गुप्ता यांच्या मते अशा डिजिटल अटक प्रकरणात चोरीच्या पैशांच्या अशा घटना धक्कादायक आहेत. याप्रकरणात आम्ही २० वेगवेगळ्या ठिकाणांहून पैसे उकळण्यात आल्याचं पाहिलं आहे. पण या प्रकरणात त्वरित तक्रार करण्याचा सुवर्णकाळ वाया गेला आहे. त्यामुळे आता या गुन्हेगारांना पकडणं अधिक आव्हानात्मक असणार आहे.”

मल्होत्रा यांनी ४ ऑगस्ट ते ४ सप्टेंबर या कालावधीत त्यांच्या खात्यांमधील तीन बँक शाखांना एकूण २१ भेटी दिल्या, तसेच १६ बँक खात्यांमध्ये २१ आरटीजीएस ट्रान्सफर केले. यामध्ये तब्बल २२.९२ कोटी रुपयांचे व्यवहार झाले. हे व्यवहार वेगवेगळ्या बँकांमध्ये केले गेले आहेत. सर्वात विशेष म्हणजे हे पैसे उत्तराखंड, पश्चिम बंगाल, आंध्र प्रदेश आणि तामिळनाडू या राज्यातील वेगवेगळ्या बँकांच्या शाखेत वळवण्यात आले. यातील ४,२३६ व्यवहारांपैकी एकही व्यवहार नवी दिल्लीतील एकाही बँकेत झालेला नाही.