नवी दिल्ली : मद्यविक्री घोटाळा प्रकरणी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या ईडी कोठडीमध्ये चार दिवसांची (१ एप्रिलपर्यंत) वाढ करण्याचा आदेश गुरुवारी राऊस जिल्हा न्यायालयाने दिला. सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) सात दिवसांची कोठडी मागितली होती. दरम्यान, न्यायालयात केजरीवाल यांनी आक्रमक युक्तिवाद करत मला तुरुंगात डांबून ठेवणे हाच मोठा घोटाळा आहे, असे सांगत ईडीच्या हेतूंवर शंका उपस्थित केली.

ईडीची सहा दिवसांची कोठडी संपल्याने गुरुवारी केजरीवाल यांना पुन्हा न्यायालयासमोर हजर करण्यात आले होते. यावेळी न्यायालयामध्ये केजरीवाल यांनी स्वत:च आक्रमक युक्तिवाद केला. कथित मद्यविक्री प्रकरणात मला जाणीवपूर्वक गोवणे, हा ईडीचा एकमेव उद्देश असल्याचे केजरीवाल यांचे म्हणणे होते.

मी ईडीच्या रिमांड याचिकेला विरोध करत नाही. ईडी मला हवे तितके दिवस कोठडीत ठेवू शकते. पण, मला तुरुंगात डांबून ठेवणे हाच मोठा घोटाळा आहे, असे सांगत केजरीवाल यांनी ईडीच्या हेतूंवर शंका उपस्थित केली. या प्रकरणामध्ये आम्ही १०० कोटींची लाच घेतली असे ईडीचे म्हणणे आहे. मग, हा पैसा आहे कुठे? पैसा कुठून कुठे गेला याचे पुरावे द्यावेत. वास्तविक,  ईडीच्या तपासानंतर खरा घोटाळा सुरू झाला आहे, असा आरोप केजरीवाल यांनी केला.

हेही वाचा >>>एएनआयच्या पत्रकाराची पीटीआयच्या महिला पत्रकाराला मारहाण; Video शेअर करत वृत्तसंस्थेनं केली कारवाईची मागणी!

मला अटक करण्यासाठी कोणतेही सबळ कारण नाही. तरीही मला अटक करण्यात आली.  कोणत्याही न्यायालयाने मला दोषी ठरवलेले नाही. या प्रकरणी सीबीआयचे आरोपपत्र ३१ हजार पानांचे असून २९० साक्षीदारांचा जबाब नोंदवण्यात आला आहे. ईडीचे आरोपपत्र २५ हजार पानांचे असून माझे नाव फक्त चार वेळा घेतले गेले आहे. मला अटक करण्याचे हे ठोस कारण आहे का, असा सवाल केजरीवाल यांनी न्यायालयात केला.

मला अटक करण्यामागे ईडीचे दोन हेतू आहेत. ‘आप’ला चिरडून टाकणे आणि विनाकारण गोंधळाचे वातावरण निर्माण करणे. त्याद्वारे खंडणी रॅकेट चालवले जात आहे. या प्रकरणी माफीचा साक्षीदार बनलेला राघन रेड्डी याने भाजपला ५५ कोटी दिले. मग, त्याला जामीन मिळाला. त्यातून खंडणी प्रकरण उघड होते. पैसे कुठून कुठे जात आहेत हेही सिद्ध होते, असाही मुद्दा केजरीवाल यांनी न्यायालयात उपस्थित केला. 

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

ईडीच्या वकिलांनी युक्तिवाद केला की केजरीवाल फक्त लोकांना उद्देशून भाषणे करत आहेत. ईडीकडे किती पुरावे आहेत हे केजरीवाल यांना कसे माहिती?  चौकशीमध्ये ते सहकार्य करत नाहीत. त्यांनी फोनचा पासवर्ड देण्यास नकार दिला आहे. त्यांनी सहकार्य केले नाही तर आम्हाला तांत्रिक मदतीने फोनमधील माहिती-विदा गोळा करावा लागेल, असे ईडीच्या वतीने न्यायालयात स्पष्ट करण्यात आले.

केजरीवाल यांना २१ मार्च रोजी अटक केली. या अटकेला केजरीवाल यांनी दिल्ली उच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. तिथेही केजरीवाल यांना दिलासा मिळू शकला नाही. उच्च न्यायालयात ३ एप्रिल रोजी सुनावणी होणार आहे.