सीएए, एनआरसीविरोधातील भाषणांचे प्रकरण

नवी दिल्ली : नागरिकत्व सुधारणा कायदा (सीएए) आणि राष्ट्रीय नागरिक नोंदणी (एनआरसी) विरोधात झालेल्या निदर्शनांदरम्यान केलेल्या कथित प्रक्षोभक भाषणांशी संबंधित प्रकरणात दिल्ली न्यायालयाने सोमवारी जेएनयूचा विद्यार्थी शर्जिल इमाम याच्यावर देशद्रोहाचे आरोप निश्चित केले.

शर्जिल इमाम याच्याविरोधात भारतीय दंड संहितेच्या कलम १२४ (देशद्रोह), १५३ ए (धर्माच्या आधारावर वेगवेगळय़ा सामाजिक गटांमध्ये शत्रुत्वास खतपाणी घालणे), १५३बी (राष्ट्रीय एकात्मतेच्या दृष्टीने प्रतिकूल वक्तव्य), ५०५ (सार्वजनिक गैरकृत्यास कारणीभूत वक्तव्ये.) आणि यूएपीए कलम १३ (बेकायदा कारवायांसाठी शिक्षा) असे आरोप निश्चित करण्याचे आदेश अतिरिक्त सत्र न्यायाधीश अमिताभ रावत यांनी दिले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

या प्रकरणात दाखल करण्यात आलेल्या तक्रारीनुसार, शर्जिल याने १३ डिसेंबर २०१९ रोजी जामिया मिलिया इस्लामिया विद्यापीठाच्या परिसरात आणि १६ डिसेंबर २०१९ रोजी अलिगड मुस्लीम विद्यापीठात कथित भाषणे केली होती. त्याने भाषणांत आसाम आणि उर्वरित ईशान्येला भारतापासून तोडण्याची धमकी देणारे वक्तव्य केले होते. इमामच्या भाषणानंतर हिंसक दंगली झाल्याचा दावा फिर्यादी पक्षाने केला होता, तर आपण दहशतवादी नसून आपल्यावरील खटला हा कट असल्याचा बचाव शर्जिल याने केला होता.  शर्जिल जानेवारी २०२० पासून न्यायालयीन कोठडीत आहे. या प्रकरणी दिल्ली पोलिसांनी त्याच्याविरोधात आरोपपत्र दाखल केले होते. त्यात केंद्र सरकारबद्दल द्वेष निर्माण करणे, अवमान करणे आणि असंतोष पसरवणे आदी आरोप ठेवण्यात आले होते.