पीटीआय, नवी दिल्ली

दिल्ली आणि राष्ट्रीय राजधानी परिसरात (एनसीआर) ग्रीन फटाके विकण्यास सर्वोच्च न्यायालयाने काही कडक अटींवर परवानगी दिली. परंपरेबरोबरच पर्यावरणही जपण्यासाठी न्यायालयाने या संदर्भात पाऊल उचलले.

ग्रीन फटाक्यांमुळे कमी प्रदूषण होते. ‘नीरी’च्या संकेतस्थळावर याची सविस्तर माहिती दिली आहे. ग्रीन फटाके उडविण्यास दिवाळीपूर्वी काही दिवस आणि प्रत्यक्ष सणांच्या दिवशी काही तास परवानगी असेल. १८ ते २० ऑक्टोबरदरम्यान फटाक्यांच्या विक्रीला परवानगी असेल. ही एक चाचणीच असून, निर्धारित वेळेसाठीच हा दिलासा असल्याचे न्यायालयाने स्पष्ट केले.सरन्यायाधीश बी. आर. गवई आणि न्या. के. विनोद चंद्रन यांच्या खंडपीठाने हे निर्देश दिले. केंद्र सरकार आणि दिल्ली सरकारची संयुक्त विनंती आणि हरित फटाका निर्मात्यांनी केलेल्या याचिकेवर खंडपीठाने आपला निर्णय दिला. २०२४ मध्ये दिल्लीमध्ये फटाकाविक्रीवर पूर्ण बंदी घालण्यात आली होती.

न्यायालय म्हणाले, ‘एकीकडे पर्यावरणामधील प्रदूषण आणि त्यामुळे उद्भवणाऱ्या आरोग्याच्या गंभीर समस्या आणि दुसरीकडे फटाका उत्पादकांचा जगण्याचा आणि व्यवसाय करण्याचा हक्क आहे. फटाके फोडणे हे सणांमधील उत्साहाचे प्रतीक आहे. देशातील सांस्कृतिक वातावरणाचा तो एक भाग आता बनला आहे. पण, अनियंत्रित फटाके फोडण्यामुळे आरोग्याला दीर्घ किंवा अल्पकालीनही धोका पोहोचता कामा नये. पर्यावरण आणि आरोग्याचा प्रश्न येतो तेव्हा व्यावसायिक विचार किंवा सणांमधील उत्साह यांचा विचार नंतर करावा लागतो, याचा हे न्यायालय पुनरुच्चार करते.’

न्यायालयाने घातलेल्या अटी

– १८ ते २० ऑक्टोबरदरम्यान ग्रीन फटाके (‘नीरी’च्या संकेतस्थळावरील) विकण्यास परवानगी. विक्रीची ठिकाणे निश्चित.

– फटाके फोडण्यास सकाळी ६ ते ७ आणि रात्री ८ ते १० दरम्यान दोन दिवस (दिवाळीपूर्वी आणि दिवाळीचा दिवस)

– पोलिसांनी जिल्हा प्रशासनाच्या सहाय्याने गस्तीची पथके स्थापन करून लक्ष ठेवावे.

– दिल्ली-एनसीआर भागात फटाक्यांच्या ऑनलाइन विक्रीला बंदी