Extramarital Affair: एखादा पुरूष जोपर्यंत पत्नीला त्रास देत असल्याचे सिद्ध होत नाही, तोपर्यंत त्याचे विवाहबाह्य संबंध असले तरी हे क्रूरता किंवा आत्महत्येस प्रवृत्त करणारे कृत्य आहे, असे म्हणता येणार नसल्याचे दिल्ली उच्च न्यायालयाने म्हटले आहे. न्यायाधीश संजीव नरुला म्हणाले की, कथित संबंध आणि हुंड्याची मागणी यांच्यात संबंध नसल्यास विवाहबाह्य संबंध हा पतीला हुंडाबळीसाठी दोषी ठरवण्याचा आधार नाही. हे निरीक्षण नोंदवत दिल्ली उच्च न्यायालयाने एका पुरूषाला पत्नीच्या मृत्यूच्या प्रकरणी जामीन मंजूर केला,
या प्रकरणातील आरोपी पतीला १८ मार्च २०२४ रोजी लग्नाच्यानंतर सुमारे पाच वर्षांनी पत्नीचा अनैसर्गिक मृत्यू झाल्यानंतर भारतीय दंड संहितेच्या हुंडाबळी आणि क्रूरता या कलमांखाली अटक करण्यात आली होती.
“या प्रकरणातील पतीचे एका महिलेबरोबर विवाहबाह्य संबंध होते हे सिद्ध करण्यासाठी सरकारी वकिलांनी काही पुराव्यांचा आधार घेतला आहे. यामध्ये काही व्हिडिओ आणि चॅट रेकॉर्ड्सचा समावेश आहे. पण, असे संबंध होते असे गृहीत धरले तरी, कायद्यानुसार विवाहबाह्य संबंध हे क्रूरता किंवा आत्महत्येस प्रोत्साहन म्हणून मानले जात नाहीत, जोपर्यंत असे दिसून येत नाही की मृत व्यक्तीला त्रास देण्यासाठी हे संबंध निर्माण केले गेले होते,” असे न्यायालयाने म्हटले.
निकालात पुढे म्हटले आहे की, “विवाहबाह्य संबंध हे आरोपीला हुंडाबळीच्या प्रकरणात गुंतवण्याचा आधार असू शकत नाही. छळ किंवा क्रूरता, हुंडा मागणी किंवा मृत्यूच्या आधी झालेल्या सततच्या मानसिक क्रूरतेशी संबंधित पाहिजे.”
दरम्यान आरोपी पती हा मार्च २०२४ पासून कोठडीत होता आणि न्यायालयाने असे नमूद केले की, त्याला तुरुंगात ठेवल्याने काही फायदा होणार नाही. न्यायालयाने पुढे असे निरीक्षण नोंदवले की, तपास पूर्ण झाल्यानंतर आरोपपत्र दाखल करण्यात आले होते आणि खटला नजीकच्या भविष्यात पूर्ण होण्याची शक्यता नाही.
पुराव्यांशी छेडछाड करण्याचा किंवा पळून जाण्याचा कोणताही धोका नसल्याचे म्हणत, न्यायालयाने ५०,००० रुपयांच्या वैयक्तिक जातमुचलक्यावर आणि तितक्याच रकमेच्या दोन जामीनदारांवर त्याची सुटका करण्याचे आदेश दिले.
महिलेच्या कुटुंबाने आरोप केला की, पतीचे त्याच्या सहकारी महिलेशी प्रेमसंबंध होते आणि जेव्हा त्याला याबाबत जाब विचारण्यात आला तेव्हा त्याने पत्नीचे शारीरिक शोषण केले. याचबरोबर पतीवर त्याच्या पत्नीविरोधात नियमित घरगुती हिंसाचार केल्याचा आणि कारसाठी तिच्या कुटुंबाकडून ईएमआयसाठी पैसे मागण्यासाठी दबाव टाकल्याचा आरोप केला आहे.