Om Birla Daughter: दिल्ली उच्च न्यायालयाने मंगळवारी भारतीय रेल्वे कार्मिक सेवा अधिकारी आणि लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांची कन्या अंजली बिर्ला यांनी कथित आक्षेपार्ह सोशल मीडिया पोस्ट विरोधात दाखल केलेला खटला निकाली काढला आहे. एक्स, गुगल आणि अज्ञात व्यक्ती (जॉन डो) यांच्या विरोधात दाखल केलेल्या खटल्यात न्यायमूर्ती ज्योती सिंह यांनी अंजली बिर्ला यांच्या बाजूने निर्णय दिला.
अंजली बिर्ला यांनी न्यायालयात मानहानीचा खटला दाखल करत सोशल मीडियावरी पोस्ट हटवण्याचे निर्देश देण्यात यावेत अशी मागणी केली होती. या पोस्टमध्ये, अंजली बिर्ला यांच्यावर, त्यांनी केंद्रीय लोकसेवा आयोगाची (यूपीएससी) परीक्षा वडिलांच्या प्रभावामुळे पहिल्याच प्रयत्नात उत्तीर्ण केली, असे आरोप करण्यात आले होते.
अंजली बिर्ला यांच्या वकिलांनी असे म्हटले होते की, अंजली बिर्ला यांनी २०१९ मध्ये यूपीएससीची परीक्षा दिली होती आणि त्यामध्ये त्यांची निवड झाली होती. त्यानंतर त्या भारतीय रेल्वेमध्ये भारतीय रेल्वे कार्मिक सेवा अधिकारी म्हणून रुजू झाल्या होत्या.
उच्च न्यायालयाने गेल्या वर्षी जुलैमध्ये दिलेल्या अंतरिम आदेशात एक्स आणि गुगल या कंपन्यांना अंजली बिर्ला यांच्याविरुद्धच्या कथित आक्षेपार्ह सोशल मीडिया पोस्ट काढून टाकण्याचे निर्देश दिले होते. तसेच अंजली बिर्ला यांनी त्यांच्या मानहानीच्या खटल्यात उल्लेख केलेल्या कथित बदनामीकारक मजकुराची पोस्ट, रिपोस्ट किंवा प्रसारण कोणीही करू नये असे आदेश दिले होते.
मंगळवारी झालेल्या सुनावणीदरम्यान, एक्स च्या वकिलांनी न्यायालयाला सांगितले की, अंजली बिर्ला यांची कथित बदनामी करणाऱ्या १६ पोस्टपैकी १२ पोस्ट ज्यांनी केल्या होत्या त्यांनीच हटवल्या आहेत तर उर्वरित चार पोस्ट एक्सने ब्लॉक केल्या आहेत.
न्यायालयाने यापूर्वी असे मत मांडले होते की, अंजली बिर्ला यांनी ज्या सोशल मीडिया पोस्टबद्दल तक्रार केली होती, त्यांची योग्य पडताळणी केलेले दिसत नाही. “अंजली बिर्ला यांची २०२१ मध्ये आयआरपीएसमध्ये निवड झाली होती. २०२४ मध्ये वादग्रस्त सोशल मीडिया पोस्ट करण्याचा उद्देश आणि त्या ज्या भाषेत पोस्ट केल्या आहेत त्या खऱ्या वाटत नाहीत,” असे २०२४ मध्ये नमूद केले होते.
“२०२१ मध्येही त्यांच्यावर असेच आरोप झाले होते, परंतु अधिकाऱ्याच्या तक्रारीवरून चौकशी केल्यानंतर हा वाद शांत झाला. तीन वर्षांनंतर, ही सोशल मीडिया मोहीम पुन्हा सुरू झाली होती. ज्या केवळ अंजली बिर्ला यांचीच नाही तर त्यांच्या कुटुंबाचीही बदनामी झाली. याचा त्यांच्या वडिलांनाही फटका बसला, जे एक राजकीय नेते आहेत आणि घटनात्मक पदावर आहेत”, असे अंजली बिर्ला यांच्या वकिलांनी न्यायालयासमोर सांगितले.