Delhi High Court Denies UP Scrap Dealer Bail Plea : भारतीय सैन्याची हेरगिरी केल्याच्या आरोपात उत्तर प्रदेश दहशतवाद विरोधी पथकाने (एटीएस) दिल्लीतल्या सीलमपूर येथील एका भंगार विक्रेत्याला अटक केली आहे. मोहसीन खान (४५) असं या आरोपीचं नाव असून आज (२४ मे) त्याला दिल्ली उच्च न्यायालयासमोर हजर करण्यात आलं. त्याने न्यायालयापुढे जामीन अर्ज केला होता जो फेटाळण्यात आला आहे.

न्यायमूर्ती स्वर्ण कांता शर्मा यांच्या खंडपीठापुढे या प्रकरणाची आज सुनावणी झाली. यावेळी न्यायमूर्ती शर्मा म्हणाल्या, “मोहसीन खान यांचे कथित गुन्हे वैयक्तिक अथवा संस्थात्मक हानीपेक्षाही गंभीर आहेत, जे देशाच्या अखंडतेला धोका निर्माण करतात. या प्रकरणात दाखल केलेला गुन्हा हा केवळ एखादी विशिष्ट व्यक्ती, संस्था अथवा कुठल्याही गटाविरोधातील गुन्हा नसून भारताची अखंडता, सार्वभौमत्व व सुरक्षेविरोधातील गुन्हा आहे. त्यामुळे या प्रकरणात तुर्तास जामीन देता येणार नाही”.

उत्तर प्रदेश एटीएसचा नेमका आरोप काय?

दुसऱ्या बाजूला मोहसीनच्या कुटुंबियांनी त्याला खोट्या प्रकरणात अडकवलं जात असल्याचा आरोप केला आहे. तसेच त्याची दुसरी पत्नी पाकिस्तानात असल्याने तो तिकडे जात होता असा दावा त्याच्या कुटुंबियांनी केला आहे. मात्र, उत्तर प्रदेश एटीएसचा दावा आहे की मोहसीनचे पाकिस्तानी संस्थांशी संबंध होते त्याने भारतातील अंतर्गत सुरक्षेसंबंधीची महत्त्वाची माहिती त्यांना दिली आहे.

आरोपीची कृत्ये राष्ट्रीय सुरक्षेसमोरील आव्हान : न्यायालय

दरम्यान, न्यायालयाने या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेतली असून न्यायमूर्ती शर्मा म्हणाल्या, “आरोपीची हेरगिरी कृत्ये राष्ट्रीय सुरक्षेसमोरील आव्हान आहे. त्यामुळे त्याला सौम्यपणे वागवता येणार नाही. हेरगिरीची कथित कृत्ये व परकीय संस्थांना संवेदनशील माहिती दिल्याच्या प्रकरणात जामीन मंजूर करता येणार नाही”.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मोहसिन खानचं मोबाईल दुरुस्ती व रिचार्जचं दुकान देखील आहे. तो हेरगिरी करणाऱ्या सिंडिकेटचा भाग असल्याचा त्याच्यावर आरोप आहे. तसेच पाकिस्तानी उच्चायुक्तालयातील अधिकाऱ्याकडून त्याने पैसे मिळवल्याचाही त्याच्यावर आरोप आहे. तसेच त्याने पोखरण येथे भारतीय सैन्यातील परमजीत कुमारकडून मिळालेली माहिती बेकायदेशीरपणे परदेशी संस्थेला विकल्याचा दावा एटीएसने केला आहे. हे सगळे आरोप सिद्ध करण्यासाठी त्यांना आरोपीची चौकशी करायची आहे. त्यामुळे न्यायालयाने त्याला कोठडी सुनावली आहे.