भारतातील सर्वात मोठ्या वाहन चोराला दिल्ली पोलिसांनी अटक केली आहे. तीन महिन्यांहून अधिक काळ पाठपुरावा केल्यानंतर दिल्ली पोलिसांनी अनिल चौहानला बेड्या ठोकल्या आहेत. अनिल चौहान याच्यावर पाच हजाराहून अधिक गाड्या चोरल्याचा आरोप आहे. अनिल चौहान आपल्या जीवनशैलीमुळे ओळखला जात होता. त्याला महागडे कपडे, सोन्याचं ब्रेस्लेट यांची आवड होती. विशेष म्हणजे त्याच्याकडे तब्बल १० कोटींचा व्हिला होता.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गाड्यांची चोरी करण्यासाठी अनिल चौहान विमानाने प्रवास करायचा. राजधानीत चोरी केल्यानंतर तो परत जायचा. त्याने गंगटोक, आसाम, नेपाळ आणि इतर काही ठिकाणी आपल्या २५ ते ३० सहकाऱ्यांच्या मदतीने या गाड्यांची विक्री केली. त्याला याआधीही अटक करण्यात आली होती. पण या प्रकरणाचा तपास सहज नव्हता.

पोलीस निरीक्षक संदीप गोदरा यांच्या नेतृत्वाखाली पथकाने मध्य दिल्लीमधील महागड्या एसय़ुव्ही आणि सेदान गाड्यांच्या चोरीचा तपास केला असता अनिल चौहान याच्यावर संशय आला. “आसाम, सिक्कीम, नेपाल आणि एनसीआरमध्ये पथक त्याचा शोध घेत होतं. अटक टाळण्यासाठी तो महागड्या गाड्यांमधून फिरत असे. आपण व्यवसायिक किंवा सरकारी अधिकारी असल्याचं तो भासवत असे. तो कंत्राटदार होता आणि आसाम सरकारसोबत काम करत होता. त्याच्या तिथे अनेक ओळखी होत्या”.

२३ ऑगस्टला पोलिसांना चौहान दिल्लीत असून सहकाऱ्यांसोबत चोरी करण्याच्या तयारीत असल्याची माहिती मिळाली. “आम्ही डीबीजी रोडवरुन त्याला दुचाकी आणि पिस्तूलसहित अटक केली. यानंतर अजून पाच पिस्तूल त्याच्याकडे सापडले,” अशी माहिती अधिकाऱ्याने दिली आहे.

गेल्या दोन दशकांमध्ये, चौहान याने केवळ कार चोरल्या नाही तर, शिंगांसाठी गेंड्यासारख्या दुर्मिळ प्राण्यांची शिकारही केली आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, त्याने गाड्यांमधून शस्त्रांची तस्करी केली. जवळपास १८१ प्रकरणांमध्ये त्याचा सहभाग असून, कोर्टाने त्याला फरार घोषित केलं होतं. ईडीने याप्रकरणी त्याचा १० कोटींचा व्हिला आणि इतर संपत्ती जप्त केली आहे.

“तो अजिबात थांबत नव्हता. त्याला अनेकदा अटक झाली होती. पण सुटका झाल्यानंतर तो पुन्हा चोरी करत असे. आसाम, नेपाल आणि गंगटोक ही त्याची मुख्य ठिकाणं होती. तो दिल्ली, नोएडा, मेरठ येथून कार चोरायचा आणि या ठिकाणी पोहोचवायचा. पोलिसांनी संशय येऊ नये यासाठी एक ते दोन महिन्यात कारची विक्री होत असे. आपल्या गुन्ह्यात सहभाग नाही दाखवण्यासाठी तो विमानाने प्रवास करत आपल्या ठिकाणी लपत असे,” असं पोलिसांनी सांगितलं आहे.

चौहानला तीन पत्नी आणि सात मुलं आहेत. ईडीचा छापा आणि अटकेनंतर ते त्याला सोडून गेले होते. दोन पत्नींनी आपल्याला त्याच्या गुन्ह्यांबद्दल काही माहिती नव्हती असा दावा केला आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

“जानेवारी महिन्यात आसाममधून त्याला अटक करण्यात आली होती. पण त्याची जामिनावर सुटका झाली होती. यावेळी आम्ही कोर्टात त्याच्याविरोधातील सर्व पुरावे सादर करणार असून, लवकर जामीन मिळणार नाही यासाठी प्रयत्न करणार आहोत. रेकॉर्डनुसार, १९९० मध्ये त्याने चोरीला सुरुवात केली होती. अनेक केसमध्ये त्याला दोषी ठरवण्यात आलं आहेत. परदेशात अंमली पदार्थांची तस्करी करण्याचाही त्याचा प्रयत्न होता,” अशी माहिती डीसीपी श्वेता चौहान यांनी दिली आहे.