सीएए विरोधक आणि सीएए समर्थक यांच्यातील वादामुळे गेल्या दोन दिवसांपासून ईशान्य दिल्ली धुमसत आहे. सोमवारी दोन्ही गट भिडल्यानंतर दिल्लीत हिंसेचा उद्रेक झाला. प्रचंड दगडफेक झाली. संतापलेल्या दोन्ही गटांनी परिसरातील दुकानं, वाहनं सार्वजनिक मालमत्तांना लक्ष्य करत जाळपोळ केली. या सगळ्या हिंसाचारात दिल्लीतील कायदा सुव्यवस्था देशभरात चर्चेचा विषय ठरला आहे. एका पोलिसासह सात जणांचे बळी घेणाऱ्या या हिंसाचाराला भाजपा नेते कपिल मिश्रा यांना जबाबदार ठरवलं जात आहे. त्यांनी केलेलं वक्तव्य आणि काढलेली रॅली यासंदर्भातील व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. कपिल मिश्रा यांचा या प्रकरणाशी नेमका संबंध आहे? याचा घेतलेला आढावा…

नेमकं प्रकरण काय?

केंद्र सरकारनं सुधारित कायदा नागरिकत्व कायदा लागू केला. त्याचबरोबर केंद्रीय अमित शाह यांनी झारखंड विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात एनआरसी लागू करणार असल्याचं सांगितलं. या दोन्ही कायद्याविरोधात दिल्लीतील शाहीन बागमध्ये मुस्लीम महिलांनी आंदोलन सुरू केलं. तब्बल दोन महिने आंदोलनं चाललं. सर्वोच्च न्यायालयाला यात मध्यस्थी करावी लागली. शाहीन बागनंतर महिलांनी जाफराबाद मेट्रो स्टेशन परिसरात आंदोलन सुरू केलं. या आंदोलनाला भाजपाचे नेते कपिल मिश्रा यांनी विरोध केला. पुन्हा शाहीन बाग होऊ देणार नाही, असं म्हणत त्यांनी याबद्दल ट्विटरवरून विरोध केला होता.

तीन दिवसात काय घडलं?

जाफराबाद, मौजपुरी परिसरात शनिवारी सीएए विरोधात महिलांनी आंदोलन सुरू केलं. त्यानंतर रविवारी याठिकाणी दगडफेक करण्यात आली. भाजपाचे नेते कपिल मिश्रा यांनी सीएए विरोधी आंदोलनाविरोधात याच परिसरात रॅली काढली होती. त्यावेळी ही दगडफेक झाली. मात्र, पोलिसांनी वेळीच परिस्थिती नियंत्रणात आणली. सोमवारी या दोन्ही गटातील वाद विकोपाला गेला. सीएए विरोधक आणि समर्थक यांच्यात प्रचंड दगडफेक झाली. दोन्हीकडील संतप्त जमावानं  जाळपोळही केली. यात शाहरूख नावाच्या व्यक्तीनं गोळीबार केला. या संपूर्ण हिंसाचारात एका पोलिसासह सात जणांचा बळी गेला आहे. या हिंसाचाराचा फटका मेट्रोलाही बसला. तसेच अनेक भागात संचारबंदी आदेश लागू करण्यात आले आहेत. मंगळवारी दिल्लीत बैठकांचा धडका सुरू आहे.

कपिल मिश्रांनी हिंसाचार भडकावला?

जाफराबादमध्ये झालेल्या हिंसाचाराला भाजपाचे नेते कपिल मिश्रा हे जबाबदार असल्याचा आरोप होत आहे. त्यांनी लोकांची डोकी भडकावणारी वक्तव्य केल्याचा आरोप आपच्या नगरसेवकांनी केला आहे. याप्रकरणी आपच्या नगरसेविका रेशमा नदीम आणि हसीब उल हसन यांनी पोलिसांत तक्रार दिली आहे. त्याचबरोबर दिल्लीतील हिंसाचार सरकार पुरस्कृत असल्याची टीका एमआयएमचे अध्यक्ष असदुद्दीन ओवेसी यांनी केली आहे.

कपिल मिश्रा यांनी खरच लोकांची डोकी भडकावली का?

दिल्लीतील हिंसाचाराला भाजपाचे नेते कपिल मिश्रा यांना जबाबदार ठरवण्यामागं महत्त्वाचं कारण ठरलं आहे त्यांनी केलेली विधानं. कपिल मिश्रा यांनी ट्विटरवरून लोक संतप्त होतील अशा पद्धतीनं वक्तव्य केली. यात त्यांनी दिल्ली पोलिसांनाही इशारा दिला होता. शाहीन बागनंतर जाफराबादमध्ये आंदोलन सुरू झाल्यानंतर कपिल मिश्रा यांनी ट्विटरवरून याला विरोध केला. दिल्लीमध्ये दुसरी शाहीन बाग तयार होऊ देणार नाही, असं ते ट्विटवरून म्हणाले.

त्याचबरोबर दिल्ली पोलिसातील वरिष्ठ अधिकाऱ्यांसमोर कपिल मिश्रा यांनी रस्त्यावर उतरून उत्तर देण्याचा इशारा दिला होता. दिल्लीतील हिंसाचार चालूच राहावा म्हणून हे आंदोलन केलं जात आहे. डोनाल्ड ट्रम्प परत जाईपर्यंत आम्ही शांत बसू. दिल्ली पोलिसांना आम्ही तीन दिवसांचा वेळ देतो. जाफराबाद आणि चांदबागचे रस्ते रिकामे करावे. केले नाही तर आम्हाला समजावू नका. मग आम्ही तुमचंही ऐकणार नाही. फक्त तीन दिवस,” असं कपिल मिश्रा यांनी व्हिडीओसह ट्विट केलं आहे.

२३ फेब्रुवारी रोजीच कपिल मिश्रा यांनी आणखी एक ट्विट केलं. “जाफराबाद येथे सुरू असलेल्या आंदोलनाला उत्तर देण्यासाठी मौजपुरी चौकात CAA समर्थनार्थ रस्त्यावर उतरत आहोत. सगळ्यांनी यावं,” असं त्यांनी म्हटलं होतं.

तोपर्यंत चुप रहा…

कपिल मिश्रांचं आणखी एक ट्विट ज्यात त्यांनी लोकांना रस्त्यावर येण्याचं आवाहन केलं होतं. जाफराबादमध्ये आता व्यासपीठ तयार केलं जात आहे. आणखी एक परिसरात भारतातील कायदे चालणं बंद होणार आहे. मोदी बरोबर म्हणाले होते की, शाहीन बाग एक प्रयोग होता. एक एक करून सगळे रस्ते, गल्ल्या, बाजार, कॉलनी गमावण्यासाठी तयार रहा. चुप रहा. जोपर्यंत तुमच्या दरवाज्यापर्यंत येत नाही, तोपर्यंत गप्प रहा,” असं वक्तव्य त्यांनी केलं होतं.

कपिल मिश्रा यांनी केलेल्या ट्विटला चांगलाच प्रतिसाद मिळाल्याचं त्यांच्या ट्विटर अकाउंटवर दिसून आलं. मौजपूरी येथे केलेल्या सीएए विरोधी आंदोलनाविरोधातील रॅलीत लोकांनी गर्दी केली. या रॅलीवेळीच रविवारी दगडफेक झाली. सोमवारी मात्र, दोन्ही बाजूंनी संतापाचा उद्रेक झाला आणि ईशान्य दिल्ली हिंसाचाराच्या आगीनं होरपळी. ज्यात सात जणांचा मृत्यू झाला.