Journalist Matt Forney: अमेरिकेत गेल्या काही काळापासून भारतीय वंशाच्या नागरिकांविरोधात टिप्पण्या व्यक्त होत आहेत. एफबीआयचे संचालक भारतीय वंशाचे अमेरिकन नागरिक काश पटेल यांना दिवाळीनिमित्त केलेल्या पोस्टबद्दल ट्रोल करण्यात आले होते. त्यानंतर आता अमेरिकन पत्रकार मॅट फोर्नी यांनी भारतीय वंशाच्या एट्सी (Etsy) कंपनीच्या पुढील सीईओ कृती पटेल गोयल यांच्याबद्दल आक्षेपार्ह विधान केले. तसेच सर्व भारतीयांना हद्दपार करा, असे विधान सोशल मीडियावर केले. त्यानंतर सर्वच स्तरातून रोष व्यक्त केला गेला. वाद वाढल्यानंतर फोर्नी यांना नोकरीवरून काढून टाकण्यात आले आहे.
ब्लेझ मीडियामध्ये पत्रकारिता करत असलेल्या मॅट फोर्नी यांना सदर पोस्ट केल्यानंतर कामावरून काढण्यात आले आहे. विशेष म्हणजे आठवड्याभरापूर्वीच त्यांची नियुक्ती झाली होती. मात्र नेमक्या कोणत्या पोस्टमुळे ही कारवाई करण्यात आली, याबद्दल कंपनीने निश्चित माहिती दिलेली नाही, असेही फोर्नी यांनी आता नव्या पोस्टमध्ये म्हटले आहे. “मला द ब्लेझमधून काढून टाकण्यात आले आहे”, असे फोर्नी यांनी नव्या पोस्टमध्ये लिहिले.
फोर्नी पुढे म्हणाले, “माझ्या एक्सवरील पोस्टना चिंताजनक म्हणून संबोधण्यात करण्यात आले आहे. मात्र कोणत्या पोस्टवर आक्षेप होता, हे मात्र सांगण्यात आलेले नाही. मी एक्सवर पोस्ट करत असल्यामुळे द ब्लेझने माझ्याशी संपर्क साधला होता. मी त्यांना शुभेच्छा देतो.”
भारतीय वंशाच्या सीईओंबद्दल काय म्हणाले?
४ नोव्हेंबर रोजी फोर्नी यांनी एक्सवर केलेल्या पोस्टमध्ये म्हटले की, सर्व भारतीयांना हद्दपार केले जावे. तसेच एट्सी (Etsy) कंपनीच्या पुढील सीईओ कृती पटेल गोयल यांच्याबद्दल बोलताना त्यांनी कृती पटेल अपात्र असल्याचे म्हटले.
“पुन्हा एकदा एका अयोग्य भारतीयाला अमेरिकन कंपनीचा ताबा दिला जात आहे. मी खात्रीने सांगतो की, त्या (कृती पटेल) सर्वात आधी प्रत्येक अमेरिकनला कामावरून काढून टाकतील. त्यांच्याजागी त्या भारतीय कामगारांची भरती करतील. थेट किंवा छुप्या पद्धतीने”, असा आरोप फोर्नी यांनी केला होता.
मॅट फोर्नी यांच्या सोशल मीडिया हँडलवर केवळ हीच भारत विरोधी पोस्ट नव्हती. तर अशा अनेक पोस्टचा रतीब त्यांनी घातला होता. ज्यामध्ये ऑपरेशन चिंप आऊट हा हॅशटॅग वापरण्यात आला होता. हा भारतीयांसाठी वापरला जाणारा एक अपमानजनक आणि वर्णद्वेषी शब्द आहे.
सोशल मीडियावर काय प्रतिक्रिया उमटल्या?
मॅनहॅटन इन्स्टिट्यूटमधील फेलो रेणू मुखर्जी यांनी फोर्नी यांच्या पोस्टला उत्तर दिले. त्या म्हणाल्या, “द ब्लेझने नुकतेच एका पत्रकाराला कामाला ठेवले आहे. जो नेहमीच भारतीयांचे वर्णन अतिशय राक्षसी वृत्तीचे लोक म्हणून करत असतो. प्रत्येक भारतीय वंशाच्या नागरिकाला हद्दपार करा, अशी त्याची भूमिका आहे. २०२४ च्या निवडणुकीत भारतीय मतदारांमुळे रिपब्लिकन पक्षाला फायदा झाला होता. मात्र हे असेच सुरू राहिले तर त्यांच्यासाठी चांगले नाही.”
मॅट फोर्नी कोण आहेत?
फोर्नी हे न्यूयॉर्कमधील लेखक आणि संपादक आहेत. न्यूयॉर्क राज्याच्या सिराक्यूज शहारातून ते येतात. त्यांच्या संकेतस्थळावरील माहितीनुसार, त्यांनी स्वतंत्र साहित्यिक प्रकाशक टेरर हाऊस प्रेसची स्थापना केली. २०१८ ते २०२४ पर्यंत मुख्य संपादक म्हणून प्रेसचे काम केले. विधी कंपन्या, पर्यटन कंपन्या आणि आरोग्य संकेतस्थळाबाबत व्यावसायिक मजूकर लिहिण्याचा त्यांना एक दशकाहून अधिकचा अनुभव आहे.
