दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूत मृत्यूप्रकरणी नोकर दीपेश सावंत याला ९ सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. यामध्येच चौकशीदरम्यान दीपेशने अनेक गोष्टींचा खुलासा केला आहे. तर काही गोष्टी या त्याच्या व्हॉट्सअॅप चॅटमधून उघड झाल्या आहेत. यातच सुशांत गांजाचं सेवन करत होता असा खुलासा दीपेशने केल्याचं ‘एनडीटीव्हीच्या वृत्तात म्हटलं आहे.

ईडीने प्राप्त केलेल्या मोबाइल चॅटनुसार अभिनेत्री रिया चक्रवर्ती आणि अन्य आरोपींसोबत दीपेशही अमली पदार्थांच्या खरेदी-विक्री व्यवहारांबाबत चर्चा करत होता. रियाचा भाऊ शोविकच्या सांगण्यावरून दीपेशने अमली पदार्थ विकत घेतल्याची माहिती एनसीबीला मिळाली होती. त्यानंतर दीपेश आणि सुशांतचा हाऊस मॅनेजर सॅम्युअल मिरांडा, शोविक चक्रवर्ती यांना अटक करण्यात आली. यावेळी झालेल्या चौकशीत सुशांतला २०१८ मध्ये गांजाचं सेवन करताना पाहिल्याचं दीपेशने सांगितलं आहे.

वाचा : कंगना रणौतला हिमाचल प्रदेश सरकारकडून सुरक्षा

“मी सुशांतसाठी कधीच गांजाची खरेदी केली नव्हती. मात्र ऋषीकेश पवार या तरुणाकरवी सुशांतसाठी अमली पदार्थ घेऊन येत असते. तसंच अब्बास खालोई हा सुशांतसाठी चरस आणि गांजा तयार करत असून ते दोघं एकत्रच ड्रग्सचं सेवन करत असे”, असं दीपेश म्हणाला.

पुढे तो म्हणतो, “मी सप्टेंबर २०१८ मध्ये सुशांतच्या घरी काम करण्यास सुरुवात केली होती. मी काम सुरु केल्यानंतरच ३-४ दिवसात सुशांत गांजाचं सेवन करत असल्याचं माझ्या पाहण्यात आलं. त्यामुळे मी अशोक भाईंना विचारलं की सुशांत सर गांजा, चरसचं सेवन करतात का. त्यावर हो ते करतात सेवन असं मला सांगण्यात आलं”.

दरम्यान, दीपेशप्रमाणेच रियाचा भाऊ शोविक चक्रवर्ती आणि सॅम्युअल मिरांडा यांनादेखील ९ सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. चित्रपटसृष्टीशी निगडीत व्यक्तींना शोविक अमली पदार्थ पुरवत होता, असा संशय एनसीबीला आहे.