Muhammad Asim Malik : जम्मू-काश्मीरच्या पहलगाममध्ये २२ एप्रिल रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या घटनेत तब्बल २६ पर्यटकांचा मृत्यू झाला, तर अनेक जण गंभीर जखमी झाले. या घटनेनंतर भारताने पाकिस्तान विरोधात अनेक मोठे निर्णय घेत पाकिस्तानी नागरिकांना भारत सोडण्याच्या आदेशासह सिंधू पाणी करार स्थगित केला. तसेच पाकिस्तानी विमानांसाठी भारताने आपलं हवाई क्षेत्र बंद करण्याचा निर्णय घेतला. पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमधील तणावाची परिस्थिती निर्माण झाली आहे.

भारताकडून पाकिस्तानवर लष्करी कारवाई केली जाऊ शकते, अशी भीती पाकिस्तानचे मंत्री अत्तातुल्लाह तरार यांनी व्यक्त केली आहे. दरम्यान, भारताकडून लष्करी कारवाई केली जाऊ शकते अशा भितीमुळे पाकिस्तानची झोप उडाली आहे. या अनुषंगाने आता पाकिस्तान सरकारने लेफ्टनंट जनरल मुहम्मद असीम मलिक यांची राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार (एनएसए) म्हणून नियुक्ती केल्याची माहिती समोर आली आहे. या संदर्भातील वृत्त हिंदुस्तान टाईम्सने दिलं आहे.

लेफ्टनंट जनरल मुहम्मद असीम मलिक यांची इंटर-सर्व्हिसेस इंटेलिजेंसचे (आयएसआय) महासंचालक म्हणूनही जबाबदारी कायम ठेवली आहे. पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताबरोबर वाढलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर पाकिस्तान सरकारने हा निर्णय घेतल्याचं बोललं जात आहे. भारताकडून संभाव्य लष्करी प्रत्युत्तराची चिंता पाकिस्तानला लागल्याची चर्चा आहे.

मुहम्मद असीम मलिक हे औपचारिकपणे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार (एनएसए) म्हणून अतिरिक्त कार्यभार सांभाळतील, असं पाकिस्तान सरकारने अधिसूचनेत म्हटल्याचं वृत्तात म्हटलं आहे. तसेच सप्टेंबर २०२४ मध्ये असीम मलिक यांची आयएसआय प्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. समोर आलेल्या माहितीनुसार असीम मलिक हे पाकिस्तानच्या राष्ट्रीय सुरक्षा धोरणासाठी महत्वाची भूमिका बजावतील.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

तज्ज्ञांच्या मते आयएसआय प्रमुख आणि राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार ही जबाबदारी एकत्रित एका व्यक्तीवर दिल्यामुळे लष्करी गुप्तचर आणि राष्ट्रीय सुरक्षा धोरणनिर्मिती यांच्यातील समन्वय वाढू शकतो. असीम मलिक हे १० वे एनएसए प्रमुख आहेत. मात्र, पहिल्यांदाच आयएसआय प्रमुखांना एकाच वेळी दोन प्रमुख पदांवर काम करण्याची जबाबदारी देण्यात आली आहे.