पीटीआय, पाटणा

बिहार विधानसभा निवडणुकीच्या दुसऱ्या आणि अखेरच्या टप्प्यासाठी नामांकन अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सोमवारी समाप्त झाली. या दरम्यान विरोधी ‘इंडिया’ गटात फूट पडल्याचे दिसून आले. राष्ट्रीय जनता दलाने (राजद) निवडणुकीसाठी १४३ उमेदवारांची नावे सोमवारी जाहीर केली. त्यात पाच ठिकाणी महाआघाडीतील उमेदवार असल्याने विसंवाद पुढे आला. त्यामुळे दुसऱ्या टप्प्यासाठीचे उमेदवारी अर्ज दाखल करण्यास काही तासांचा अवधी उरला असताना उमेदवार घोषित करण्यात आले.

काँग्रेसविरोधात वैशाली मतदारसंघात तर मुकेश सहानी यांच्या ‘विकासशील इन्सान’ पक्षाविरोधात लालगंज व खहलगाव मतदारसंघात राष्ट्रीय जनता दलाने उमेदवार जाहीर केले. तेजस्वी यादव हे राघोपूर मतदारसंघातून निवडणूक लढवतील. ‘राजद’ने २१ महिलांना संधी दिली आहे. पक्षावर सत्तेत असताना ‘जंगलराज’ आणल्याचा आरोप होत होता. त्यामुळे ही प्रतिमा बदलण्याचा प्रयत्न यानिमित्ताने झाला आहे. संयुक्त जनता दल तसेच भाजपच्या तुलनेत ‘राजद’ने अधिक महिलांना संधी दिली आहे. मुस्लीम व यादव हा पक्षाचा प्रमुख आधार पाहता या समुदायातून अधिकाधिक उमेदवारी देण्यात आली आहे.

काँग्रेस ६१ जागांवर लढणार

काँग्रेस पक्षाच्या वाट्याला गेल्या वेळीपेक्षा नऊ जागा कमी आल्या आहेत. यंदा काँग्रेस ६१ जागांवर लढणार आहे. पाच जागांवर काँग्रेस व राजदच्या उमेदवारांनी एकमेकांविरोधात अर्ज दाखल केले आहेत. याखेरीज एका मतदारसंघात भारतीय कम्युनिस्ट पक्षाविरोधात काँग्रेसच्या उमेदवाराने अर्ज भरला.

– काँग्रेसने अनेक ठिकाणी चुकीचे उमेदवार दिल्याचा आरोप पक्षाच्या एका नेत्याने केला. मित्रपक्षांनी आमची अपरिहार्यता समजून घ्यावी अशी प्रतिक्रिया राष्ट्रीय जनता दलाचे प्रवक्ते मृत्युंजय तिवारी यांनी दिली. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष राजेश कुमार राम यांच्या मतदारसंघात राजदने उमेदवार दिलेला नाही.

झारखंड मुक्ती मोर्चाचा मित्रपक्षांवरच आरोप

बिहार विधानसभा निवडणुकीतून विरोधी ‘इंडिया’ आघाडीचा घटक पक्ष असलेल्या झारखंड मुक्ती मोर्चाने माघार घेतली. मित्रपक्ष असलेल्या राष्ट्रीय जनता दल तसेच काँग्रेसने षड्यंत्र रचल्याचा आरोप पक्षाचे नेते सुदिव्य कुमार यांनी केला. याबाबत युतीचा फेरविचार करू असा इशारा त्यांनी दिला. झारखंड मुक्ती मोर्चाने सुरुवातीला काही जागा लढण्याचे जाहीर केले होते.

नाट्यमय अटक

सासाराम येथील ‘राजद’चे उमेदवार सत्येंद्र साह यांना झारखंड पोलिसांच्या पथकाने उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर लगेचच अटक केली. झारखंड पोलिसांनी त्यांच्याविरुद्ध प्रलंबित असलेल्या एका खटल्याच्या संदर्भात ही अटक केली. ‘इंडिया’ आघाडीच्या उमेदवारांला अटक करण्याची ही तिसरी घटना ठरली आहे. यापूर्वी, गेल्या आठवड्यात सीपीआय (एमएल) लिबरेशनचे उमेदवार जितेंद्र पासवान आणि सत्यदेव राम यांना अनुक्रमे भोरे आणि दरौली येथून उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर लगेचच अटक करण्यात आली होती.