लॉस एंजेलिस : ९७व्या ऑस्कर पुरस्कार सोहळ्यामध्ये ‘एमिलीया पॅरेझ’च्या कामगिरीकडे सर्वांचे लक्ष होते. ‘एमिलीया’ला सर्वोत्तम परभाषिक चित्रपट, सर्वोत्तम दिग्दर्शन, सर्वोत्तम अभिनेत्री अशा विविध १३ विभागांमध्ये नामांकन मिळाले होते. मात्र, सर्वोत्तम साहाय्यक अभिनेत्रीसाठी झोई साल्डानाला आणि ‘एल माल’ या सर्वोत्तम मूळ गीताला मिळालेले पुरस्कार वगळता या चित्रपटाच्या हाती निराशा आली.

गुन्हेगारी नाट्य असलेल्या या चित्रपटाला संगीताचीही भक्कम साथ होती. ‘कान’, ‘गोल्डन ग्लोब’, ‘बाफ्टा’, ‘सेझर’, ‘एएफआय’, युरोपीय चित्रपट पुरस्कार सोहळा अशा विविध ठिकाणी पुरस्कार जिंकलेल्या ‘एमिलीया पॅरेझ’ला ऑस्करसाठी १३ विभागांमध्ये एकूण दोन पुरस्कार मिळाले. अगदी काही महिन्यांपूर्वीपर्यंत सर्वोत्तम परभाषिक चित्रपटासाठी ‘एमिलीया’लाच ऑस्कर मिळणार अशी सर्वांची खात्री होती, प्रत्यक्षात सर्वोत्तम अभिनेत्रीच्या स्पर्धेत असलेल्या कार्ला सोफिया गॅस्कोनने २०२० आणि २०२१मध्ये केलेल्या काही आक्षेपार्ह ट्विटमुळे वाद निर्माण झाला होता. अमेरिकेत श्वेतवर्णीय पोलीस अधिकाऱ्याने हत्या केलेल्या जॉर्ज फ्लॉइड या कृष्णवर्णीय नागरिकावर तिने वर्णद्वेषी टीका केली होती. त्याविषयी तिने खुलासा केला. पण त्याचे सावट ऑस्करवर पडण्याची शक्यता खरी ठरली.

नो अदर लँडसर्वोत्कृष्ट माहितीपट

लॉस एंजेलिस : इस्रायलच्या लष्कराकडून पॅलेस्टिनी नागरिकांचे संरक्षण करणाऱ्या कार्यकर्त्यावर आधारित ‘नो अदर लँड’ हा सर्वोत्कृष्ट माहितीपट ठरला. इस्रायल आणि पॅलेस्टिनी चित्रपटनिर्मात्यांनी मिळून हा माहितीपट तयार केला आहे. पॅलेस्टिनी सामाजिक कार्यकर्ते बसेल अॅड्रा यांनी वेस्ट बँकच्या दक्षिणेकडे असलेले शहर उद्ध्वस्त होतानाचे चित्रण केले आहे.

सर्वोत्तम अभिनेत्याकडून शांततेचा संदेश

‘द ब्रुटलिस्ट’ चित्रपटासाठी सर्वोत्तम अभिनेत्याचा पुरस्कार मिळविणाऱ्या एड्रियन ब्रॉडी यांनी यावेळी युद्धाबद्दल चिंता व्यक्त केली. ते म्हणाले, ‘‘युद्धामुळे दीर्घ काळ होणाऱ्या वेदना आणि परिणाम दाखविण्यासाठी, अतिशय सुनियोजित पद्धतीने होत असलेली दडपशाही, वंशवाद दाखविण्यासाठी मी पुन्हा व्यासपीठावर आलो. एकमेकांवर प्रेम कायम ठेवतानाच पुन्हा उभारी घेऊया.’’

अग्निशमन दलाचा सत्कार

लॉस एंजेलिसमध्ये जानेवारी महिन्यात तीव्र स्वरुपाच्या वणवा विझविण्यासाठी अविरत कष्ट घेणाऱ्या अग्निशमन दलातील जवानांचा ऑस्कर सोहळ्यात खास सत्कार करण्यात आला. लॉस एंजेलिसमधील अनेकांना आपली घरे सोडून जावे लागले होते. या वणव्यांमुळे ऑस्कर पुरस्काराचा कार्यक्रमही पुढे ढकलण्यात आला होता. कोनान ओब्रायन यांनी अग्निशमन दलातील जवानांचे स्वागत केले. या वेळी प्रेक्षकांनी उभे राहून टाळ्यांच्या कडकडाटात त्यांना दाद दिली.

चित्रपटगृहात इतर प्रेक्षकांबरोबर जाऊन चित्रपट पाहण्याचा एक वेगळाच अनुभव असतो. आपण सर्व जण एकत्र हसतो, भावनिक होतो. पण, आता असा अनुभव दुर्मीळ होत चालला आहे. चित्रपटगृहे त्यांच्या अस्तित्वासाठी झगडत आहेत. करोनाकाळात अमेरिकेत चित्रपट दाखविणारे एक हजार स्क्रीन कमी झाले. आजही ही संख्या कमी होत आहे. आपल्या संस्कृतीमधील एक महत्त्वाचा भाग आपण गमावत आहोत.

शॉन बेकरदिग्दर्शक, ‘अनोरा’

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

● झोई साल्डाना हिला सर्वोत्तम सहायक अभिनेत्रीसाठी ऑस्कर पुरस्कार मिळाला. झोई साल्डाना हिने पुरस्कार मिळाल्याबद्दल आनंद व्यक्त केला. डॉमिनिकन रिपब्लिक अमेरिकन म्हणून पहिलाच ऑस्कर मिळत असल्याचे पुरस्कार सोहळ्याच्या वेळी साल्डानाने सांगितले.