गुजरातमधील विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सध्या काँग्रेससह विरोधी पक्षांनी भाजपविरोधी जोरदार प्रचारमोहीम उघडली आहे. यानिमित्ताने विरोधकांकडून भाजप सरकारचे अपयश अधोरेखित करणारे आरोप आणि टीका होत आहे. याशिवाय, गेल्या काही दिवसांत गुजरातमध्ये विरोधक एकटवत असल्याने राज्यात भाजपविरोधी वातावरणनिर्मितीला हातभार लागत आहे. त्यामुळे भाजपचे कार्यकर्ते काहीसे धास्तावले असून त्यांच्यात नकारात्मक भावना निर्माण झाल्याचे चित्र आहे. या पार्श्वभूमीवर सध्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वडोदरा येथील एका कार्यकर्त्याशी केलेले टेलिफोन संभाषण सध्या भाजपसाठी बुस्टर ठरत आहे. ऑडिओ ब्रिज तंत्रज्ञानाच्या माध्यमातून भाजपच्या २० हजार कार्यकर्त्यांनी हे संभाषण ऐकले. यामुळे कार्यकर्त्यांचे मनोबल उंचावेल, अशी आशा भाजपच्या नेत्यांनी व्यक्त केली.

‘नोटाबंदी’ ही मोदीनिर्मित आपत्ती : राहुल गांधी

नरेंद्र मोदी यांनी दिवाळीच्या दिवशी वडोदरा येथील भाजपचे कार्यकर्ते गोपाळ गोहिल यांना शुभेच्छा देण्यासाठी फोन केला होता. यावेळी गोहिल यांनी सुरूवातीचे बोलणे झाल्यानंतर विरोधकांच्या टीकेमुळे पक्षाच्या कार्यकर्त्यांचे मनोबल खचल्याची बाब मोदींच्या निदर्शनास आणून दिली. त्यामुळे कार्यकर्त्यांना या निराशेच्या गर्तेतून बाहेर कसे काढायचे, असा सवाल गोहिल यांनी मोदींना विचारला. त्यावर मोदी यांनी २००७ सालच्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी त्यांच्यावर केलेल्या टीकेचा दाखला दिला. त्यावेळी काँग्रेसने गुजरात दंगलीचा दाखला देत मोदींना ‘मौत का सौदागर’ म्हटले होते. मात्र, लोकांना खऱ्या खोट्याची पारख असते. जनसंघ स्थापन झाल्यापासूनच नेत्यांना अशाप्रकारच्या टीकेचा सामना करावा लागतोय. कदाचित अशाप्रकारची टीका आपल्या नशिबातच असावी. मात्र, तरीही आपण आज या स्थानापर्यंत पोहोचलो आहोत. त्यामुळे तुम्ही टीकेची चिंता करू नका. भाजविरोधात सुरू असलेली टीका, नकारात्मक चर्चा आणि अपप्रचार यांची चिंता करण्यात कार्यकर्त्यांनी वेळ घालवू नये. त्याऐवजी लोकांसमोर सत्य कशाप्रकारे आणता येईल, यावर लक्ष केंद्रित करावे. आपण लोकांच्या कल्याणासाठी रक्त आणि घाम गाळला आहे. भाजप इतक्या दीर्घकाळ सत्तेत आहे हे की आपल्यावर आरोप करणाऱ्यांबद्दल विश्वासार्हता नाही. आपण मजबूत स्थितीत आहोत. त्यामुळे आपले चांगले काम लोकांपर्यंत पोहोचवा, असा सल्ला मोदींनी दिला.

अविवाहितांना भाजपमध्ये चांगलं भविष्य – भाजप मंत्री