बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी सोमवारी राज्यातील दारुबंदी उठवण्यासंदर्भातील आपली भूमिका पुन्हा एकदा अधोरेखित केली. राज्यामध्ये बाहेरुन येणाऱ्या व्यक्तींसाठी दारुबंदीचे नियम शिथिल करावेत अशी मागणी केली जात असतानाच मुख्यमंत्र्यांनी कठोर शब्दांमध्ये ही मागणी धुडकावून लावलीय. सासाराम येथील एका कार्यक्रमामध्ये बोलताना नितीश कुमार यांनी राज्यातील दारुबंदींचं समर्थन केलं आहे.
“काही लोक म्हणतात की राज्यामध्ये बाहरुन येणाऱ्या लोकांना थोड्या प्रमाणात दारु सेवन करण्याची परवानगी द्यावी. पण हे शक्य आहा का? आपण त्यांना दारु पिण्यास परवानगी देणार का? तुम्ही इतर राज्यांमधून आलेल्यांना दारु पिण्यास परवानगी देणार का?, असं मला विचारण्यात येत. यावर मी एकच सांगेन की जर तुम्ही दारुचं सेवन करता आणि तुम्हाला बिहारमध्ये येऊन दारु पिण्यास अडचणी येत असतील तर बिहारमध्ये येऊ नका. तुम्ही लोकांनी बिहारमध्ये येण्याची काहीच गरज नाहीय,” असं रोकठोक मत नितीश कुमार यांनी सोमवारी एका कार्यक्रमामध्ये भाषण देताना व्यक्त केलं.
इतर राज्यांमध्ये आणि राज्याच्या बाहेरुन आलेल्यांसाठी दारुबंदीचे नियम शिथिल करण्याचा प्रश्नच येत नाही, अशी ठाम भूमिका मुख्यमंत्र्यांनी घेतल्याचं पहायला मिळत आहे. दारुबंदीच्या आपल्या निर्यणाचं सर्वच स्तरांमधून स्वागत करण्यात आल्याचा दावा मुख्यमंत्र्यांनी केलाय. एखादी व्यक्ती मद्यपान करत असेल तर किती शिकलेली आहे किंवा किती बुद्धीवान आहे याचा काही विशेष फरक पडत नाही, असा टोलाही मुख्यमंत्र्यांनी लगावलाय. “असे लोक सक्षम नसतात आणि ते महात्मा गांधींच्या विचारांविरोधात आणि सामाजाविरोधात असतात,” असं नितीश कुमार म्हणालेत. नितीश कुमार ज्या कार्यक्रमात बोलत होते तो कार्यक्रम सामाजिक बदलांसाठी नितीश कुमार यांच्या पुढाकाराने जनजागृती मोहिमेअंतर्गत राबवण्यात आलेल्या कार्यक्रमांपैकी एक होता.