अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आर्थिक मदत थांबवण्याची घोषणा केल्यानंतर पाकिस्तानमध्ये एकच खळबळ उडाली. पण तरीही पाकने आपला मुजोरपणा कायम ठेवला आहे. अफगाणिस्तानमधील युद्धासाठी अमेरिकेकडून पाकिस्तानच्या साधनांचा वापर केला जातो. त्याचीच किंमत ते अदा करतात, असे पाकचे विदेश मंत्री ख्वाजा आसिफ यांनी म्हटले. त्याचबरोबर ट्रम्प यांच्या ‘नो मोअर’ ला काही महत्व नसून पाकिस्तान त्यांची हुकूमशाही कदापि सहन करणार नाही, असे वक्तव्यही त्यांनी केले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

ट्रम्प यांनी नवीन वर्षाच्या आरंभीच पाकिस्तानला फटकारले होते. अमेरिकेने गेल्या १५ वर्षांपासून पाकला ३३ अब्ज डॉलरची मदत केली, हा मूर्खपणा होता. या मदतीच्या बदल्यात आम्हाला खोटेपणाशिवाय काहीच मिळाले नाही. आमच्या नेत्यांना मूर्ख समजण्यात आले. त्यांनी दहशतवाद्यांना आसरा दिला आणि आम्ही त्यांना अफगाणिस्तानमध्ये शोधत बसलो. आता आणखी शक्य नाही, असे ट्विट ट्रम्प यांनी केले. या ट्विटनंतर ख्वाजा यांनी लवकरच सर्व सत्य समोर आणले जाईल, असेही म्हटले होते.

पाकिस्तानच्या ‘जिओ न्यूज’ या वाहिनीला मुलाखत देताना आसिफ म्हणाले की, आम्ही अमेरिकेला आधीच सांगितले आहे की, याबाबत आता आम्ही आणखी काही करू शकत नाही. त्यामुळे ट्रम्प यांच्या ‘नो मोअर’ला काही महत्व नाही.

पाकिस्तानला कोट्यवधी डॉलर निधी देण्याच्या ट्रम्प यांच्या दाव्यावर ते म्हणाले की, जर आम्ही ते पैसे घेतले असेल तर हे पाकिस्तानकडून देण्यात आलेल्या सेवांचे पैसे आहेत. अफगाणिस्तानमधील पराभवामुळे ट्रम्प दु:खी आहेत आणि त्यासाठी ते पाकिस्तानला दोष देत आहेत. आमची जमीन, रस्ता, रेल्वे आणि इतर सेवांचा उपयोग करण्यात आला. त्याबदल्यात आम्हाला पैसे देण्यात आले. त्याची तपासणीही झालीय, असेही ते म्हणाले.

पाकिस्तानला अशा निधीची गरज नाही. पाकिस्तानला इतका निधी का दिला, ते ट्रम्प आपल्या प्रशासनाला विचारू शकतात. आमच्या दृष्टीने पाकिस्तानचे हित सर्वांत अग्रस्थानी असते. आम्हाला इतर दुसऱ्या देशाचे रक्षण करायचे नाही. पाकिस्तानचे हित हेच आमच्या दृष्टीने महत्वाचे आहे. कोणत्याही परिस्थितीत अमेरिकेची हुकूमशाही स्वीकारहार्य नाही, असेही ते म्हणाले.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Do not seek american help we never bear such dictatorship says pakistan
First published on: 02-01-2018 at 11:52 IST