Kolkata Gang Rape : पश्चिम बंगालच्या दुर्गापूर या ठिकाणी MBBS चं शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनीवर सामूहिक बलात्कार करण्यात आल्याची घटना समोर आली आहे. या घटनेने संपूर्ण राज्य हादरलं आहे. या प्रकरणात आता पीडितेच्या वडिलांची प्रतिक्रिया समोर आली आहे. पीडिता मुळची ओडिशाची होती. तिचे वडील म्हणाले की मी तिला सांगितलं होतं बंगालमध्ये राहू नकोस असं तिला सांगितलं होतं, अशी प्रतिक्रिया त्यांनी माध्यमांना दिली.

नेमकी घटना काय घडली?

पश्चिम बंगालच्या पश्चिम वर्धमान जिह्यातील दुर्गापूर येथील खासगी वैद्यकीय महाविद्यालयात एमबीबीएसचे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थीनीवर शुक्रवारी रात्री तिच्याच महाविद्यालयाच्या संकुलात बलात्कार करण्यात आल्याचा आरोप होत आहे. २०२४ मध्ये घडलेल्या आरजी कर वैद्यकीय महाविद्यालय आणि यावर्षी विधी महाविद्यालयात घडलेल्या बलात्कार प्रकरणानंतर पुन्हा एकदा महाविद्यालयातच अशाप्रकारची घटना घडल्यामुळे चिंता व्यक्त करण्यात येत आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित मुलगी मुळची ओडिशाची राहणारी आहे. शुक्रवारी रात्री ती तिच्या मित्रासह संकुलाच्या बाहेर आली होती. तेव्हा तिला काही जणांनी संकुलाच्या मागे असलेल्या झुडुपात ओढत नेले आणि लैंगिक अत्याचार केला. पोलिसांना याची माहिती प्राप्त झाल्यानंतर त्यांनी घटनास्थळी धाव घेतली आणि पीडितेला रुग्णालयात दाखल केले. पीडितेला गंभीर दुखापत झाली असून तिच्यावर उपचार सुरू आहेत.

पीडितेच्या वडिलांनी काय प्रतिक्रिया दिली?

माझ्या मुलीला प्रचंड वेदना सहन कराव्या लागत आहेत. ती बोलूही शकत नाही अशा अवस्थेत आहे. ती अंथरुणाला खिळली आहे. मला तिच्या सुरक्षेची अजूनही चिंता वाटते आहे. कारण ते लोक ज्यांनी हे कृत्य केलं ते कधीही तिला ठार मारु शकतात अशी भीती मला आहे. त्यामुळे तिला ओडिशाला घेऊन जायचं आहे. आम्हाला वाटत होतं की तिने बंगालमध्ये शिकायला येऊ नये आणि इथे राहू नये. या राज्यावरुन आमचा विश्वासच उडाला आहे. तिने तिचं शिक्षण ओडिशामध्ये राहून पूर्ण करायला हवं होतं. असं म्हणत पीडितेच्या वडिलांनी आपल्या भावनांना वाट करुन दिली आहे.

मी ओडिशाच्या मुख्यमंत्र्यांना विनंती केली आहे की..

पीडितेचे वडील म्हणाले, ओडिशाचे मुख्यमंत्री माझ्याशी बोलले. प्रशासनाकडूनही आम्हाला मदत केली जाते आहे. पण मी आता त्यांना ही विनंती केली आहे की माझ्या मुलीला तुम्ही उपचारांसाठी ओडिशाला जाण्याची संमती द्या असंही पीडितेच्या वडिलांनी ANI ला सांगितलं. दरम्यान या प्रकरणात पोलिसांनी तीन जणांना अटक केली आहे. फिरदोस शेख, अपा बाऊरी, सेख रिआजउद्दीन अशी या तिघांची नावं आहेत अशी माहिती पोलीस सूत्रांनी दिली आहेत. एनडीटीव्हीने हे वृत्त दिलं आहे.