Donald Trump Application For Bihar Residence Certificate: बिहारच्या समस्तीपूर जिल्ह्यात डोनाल्ड ट्रम्प यांच्या नावाने रहिवासी दाखल्यासाठी आलेला ऑनलाइन अर्ज महसूल विभागाने फेटाळला आहे. यानंतर जिल्हा प्रशासनाने या संदर्भात एफआयआर नोंदवण्याचे आदेश दिले आहेत, जेणेकरून गैरप्रकार करणाऱ्या व्यक्तीला शोधून अटक करता येईल.

एका निवेदनात प्रशासनाने म्हटले आहे की, “२९ जुलै रोजी डोनाल्ड ट्रम्प यांच्या नावाने रहिवासी दाखल्यासाठी अर्ज करण्यात आला होता आणि महसूल विभागाच्या संबंधित अधिकाऱ्याने ४ ऑगस्ट रोजी तो फेटाळला. अर्जात अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांचा फोटो होता आणि ते जिल्ह्यातील हसनपूर गावातील रहिवासी असल्याचे नमूद करण्यात आले होते. याचबरोबर गैरप्रकार करणाऱ्याने इंटरनेटवर संशोधन करून अर्ज केला होता, कारण पालकांची नावे फ्रेडरिक क्राइस्ट ट्रम्प आणि मेरी अ‍ॅन मॅकलिऑड अशी देण्यात आली होती, जी अमेरिकन राष्ट्राध्यक्षांच्या खऱ्या वडिलांचे आणि आईचे नाव आहे.”

निवडणूक आयोगाने जून महिन्यात मोठ्या प्रमाणात मतदार याद्यांचे पुनर्निरीक्षण सुरू केल्यापासून राज्यातील ही अशा प्रकारची चौथी घटना आहे. अलीकडेच पाटण्याच्या ग्रामीण भागात ‘डॉग बाबू’, तर नवादा येथे ‘डोगेश बाबू’ या नावाने अर्ज प्राप्त झाले आहेत. पूर्व चंपारण जिल्ह्यात एका भोजपुरी अभिनेत्रीचा फोटो असलेला ‘सोनालिका ट्रॅक्टर’ या नावाने अर्ज करण्यात आला होता. वरील सर्व प्रकरणांमध्ये अर्ज नाकारण्यात आले असून संबंधित पोलीस ठाण्यांमध्ये एफआयआर दाखल करण्यात आले आहेत.

समस्तीपूर जिल्हा प्रशासनाने असेही म्हटले आहे की, “गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन, योग्य तपास आणि कारवाईसाठी समस्तीपूरच्या सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.”

मतांची चोरी करण्याच्या उद्देशाने…

काँग्रेसचे नेते रणदीप सिंह सुरजेवाला यांनी एक बातमी शेअर केली आहे, ज्यामध्ये म्हटले आहे की अर्जाशी संबंधित “प्रमाणपत्र जारी करण्यात आले आहे”.

सुरजेवाला म्हणाले, “बिहारमधील मतदार यादीतील पुनर्निरीक्षण ही मतांची चोरी करण्याच्या उद्देशाने केलेली फसवणूक आहे, याचा हा सर्वात मोठा पुरावा आहे. काँग्रेस आणि राहुल गांधी हे कट उधळण्यासाठी लढत आहेत. अशा परिस्थितीत मौन बाळगणे हा गुन्हा आहे. आपण सर्वांनी आपला आवाज उठवूया आणि लोकशाहीचे रक्षक बनूया.”

यावर समस्तीपूर प्रशासनाने स्पष्ट केले की, “प्रमाणपत्र जारी करण्यात आले नाही. कोणीतरी जाणूनबुजून असा अर्ज केला होता आणि तो तपासादरम्यान फेटाळण्यात आला. या प्रकरणात एफआयआर देखील नोंदवण्यात आला आहे. दोषींना सोडले जाणार नाही.”