Donald Trump 90-days tariff pause News True or Fake : अमेरिकेच्या नव्या आयात शुल्क धोरणामुळे जगभरातील अनेक देशांचे शेअर बाजार गडगडले आहेत. भारतही या धक्क्यापासून सुटलेला नाही. अशातच काही प्रसारमाध्यमांनी दावा केला आहे की डोनाल्ड ट्रम्प चीनवगळता इतर सर्व देशांना आयात शुल्कापासून दिलासा देऊ शकतात. ट्रम्प यांच्या आर्थिक सल्लागाराचा हवाल्याने काही प्रसारमाध्यमांनी म्हटलं आहे की डोनाल्ड ट्रम्प चीनवगळता इतर देशांवरील आयात शुल्क ९० दिवसांसाठी स्थगित करण्याबाबत विचार करत आहेत. दरम्यान, हे वृत्त व्हाइट हाऊसने (अमेरिकेच्या अध्यक्षांचं कार्यालय व निवासस्थान) फेटाळलं आहे. हे खोटं वृत्त असल्याचं व्हाइट हाऊसने स्पष्ट केलं आहे.

व्हाइट हाऊसच्या प्रेस सेक्रेटरी कॅरोलिन लेव्हिट यांनी अमेरिकन वृत्तवाहिनी सीएनबीसीशी बातचीत केली. यावेळी त्या म्हणाल्या, “अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आयात शुल्कासंबंधीचं धोरण ९० दिवसांसाठी थांबवणार असल्याचं वृत्त खोटं आहे. ट्रम्प यांचा असा कोणताही विचार नाही.”

डोनाल्ड ट्रम्प यांनी शेअर केला व्हिडीओ

डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वतः समाजमाध्यमांवर फॉक्स बिझनेस या वृत्तवाहिनीच्या वृत्तनिवेदिका मारिया बार्टीरोमो यांचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये मारिया म्हणाल्या आहेत की “व्याजदर खाली येत आहेत, तेलाच्या किंमती कमी होत आहेत, नियमनमुक्ती होत आहे, अध्यक्ष ट्रम्प झुकणार नाहीत.”

अमेरिकेतील Goldman Sachs या गुंतवणूक बँक व आर्थिक सेवा पुरवणाऱ्या कंपनीच्या संशोधन प्रमुखांनी दावा केला होता की ट्रम्प यांनी आयात शुल्कासंबंधीच्या निर्णयापासून माघार घेतली तरी जगभर आर्थिक मंदी येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. जागतिक व्यापाराचं संतुलन व देशांतर्गत उत्पादन वाढवण्यासाठी आयात शुल्क आवश्यक आहे. यवर ट्रम्प यांनी भर दिला आहे. अमेरिकेला सर्वात वाईट वागणूक देणारा चीन हा सर्वात मोठा गुन्हेगार आहे. त्यांना उत्तर द्यायला हवं.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

अमेरिका व चीनमध्ये व्यापारयुद्ध

अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ‘जशास तशा’ (परस्पर) आयात शुल्काची घोषणा केल्यानंतर चीननेही अमेरिकेला जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. चीनने शुक्रवारी अमेरिकी वस्तूंवर आणखी ३४ टक्के आयातशुल्क लादले. तर, आंतरराष्ट्रीय बाजारात मक्तेदारी असलेल्या काही दुर्मिळ संयुगांच्या अमेरिकेला होणाऱ्या निर्यातीवरही जिनपिंग प्रशासनाने निर्बंध आहेत. त्यानंतर आज (सोमवार, ७ एप्रिल) भारतासह जगभरातील अनेक देशांचे शेअर बाजार गडगडले.