Donald Trump vs Kevin Rudd VIDEO : अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सोमवारी (२० ऑक्टोबर) व्हाइट हाऊसमध्ये ऑस्ट्रेलियाचे राजदूत व माजी पंतप्रधान केव्हिन रुड यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला. ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान अ‍ॅन्थोनी अल्बनीज यांच्याबरोबरच्या बैठकीवेळी ट्रम्प यांनी रुड यांच्या जुन्या टीकेवर तीव्र आक्षेप नोंदवला. यावेळी ट्रम्प रुड यांना म्हणले, “मलाही तू आवडत नाही, आवडणारही नाहीस.”

अमेरिका व ऑस्ट्रेलियामध्ये नुकताच पाणबुडी खरेदीचा करार करण्यात आला. या कराराची पुष्टी करण्यासाठी दोन्ही देशांचे प्रमुख नेते व अधिकाऱ्यांच्या शिष्टमंडळांची व्हाइट हाऊसमध्ये बैठक पार पडली. या बैठकीत एका पत्रकाराने ट्रम्प यांना रुड यांनी त्यांच्यावर याआधी केलेल्या टीकेबद्दल प्रश्न विचारला होता. त्यावर ट्रम्प पत्रकारांना म्हणाले, ते (रुड) कुठे आहेत? ते अजूनही तुमच्यासाठी काम करतात का?

व्हाइट हाऊसमध्ये नेमकं काय घडलं?

त्यावर अल्बनीज यांनी रुड यांच्या दिशेने इशारा केला. रुड यावेळी अल्बनीज यांच्यासमोरच बसले होते. त्यावर रुड काहीतरी बोलत होते. मात्र, ट्रम्प यांनी रुड यांना बोलू दिलं नाही. ते रुड यांच्याकडे पाहून म्हणाले, “मलाही तू आवडत नाही, आवडणारही नाहीस.” अल्बनीज यांच्यासह या बैठकीला उपस्थित सर्व अधिकारी ट्रम्प यांच्या या वक्तव्यावर हसू लागले. मात्र, या घटनेमुळे ट्रम्प व रुड यांच्यातील जुना तणाव समोर आला.

रुड यांच्याकडून ट्रम्प यांचा ‘पश्चिमेकडील गद्दार’ असा उल्लेख

रुड हे अल्बनीज यांच्या मजुर पक्षाचे (लेबर पार्टी) नेते आहेत. २०२० मध्ये डोनाल्ड ट्रम्प यांचा अमेरिकेच्या अध्यक्षीय निवडणुकीत झालेल्या पराभवानंतर रुड यांनी ट्रम्प यांच्यावर जोरदार टीका केली होती. रुड म्हणाले होते की “ट्रम्प हे जगाच्या इतिहासातील सर्वात क्रूर राजकारणी व विनाश घडवून आणू पाहणारे अमेरिकेचे अध्यक्ष आहेत.” तसेच रुड यांनी ट्रम्प यांचा ‘पश्चिमेकडील गद्दार’ असा उल्लेख केला होता.

दरम्यान, २०२४ मधील अमेरिकेच्या निवडणुकीतील प्रचारसभांमध्ये ट्रम्प यांनी रुड यांच्या टीकेला उत्तर दिलं होतं. तसेच ट्रम्प यांनी दावा केला होता की रुड हे फार काळ ऑस्ट्रेलियाचे राजदूत राहणार नाहीत.

व्हाइट हाऊसमधील कार्यक्रमावेळी ऑस्ट्रेलियाच्या शिष्टमंडळाने रुड यांच्यावरील ट्रम्प यांची टिप्पणी हसण्यावारी नेली असली तरी यामुळे उभय देशांमध्ये तणाव निर्माण होऊ शकतो. या घटनेमुळे ट्रम्प व रुड यांच्यातील वैयक्तिक स्तरावरील तणाव पुन्हा एकदा समोर आला आहे.