Donald Trump Announcement: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतीय प्रमाणवेळेनुसार गुरुवारी संध्याकाळी केलेल्या पोस्टमध्ये अमेरिकन संसदेनं घेतलेल्या मोठ्या निर्णयाची माहिती दिली आहे. अवघ्या जगावर समन्यायी व्यापार कराच्या माध्यमातून भरमसाठ आर्थिक निर्बंध घालणारे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकन नागरिकांसाठी मोठी करकपात जाहीर केली आहे. “एक मोठं आणि फार सुंदर विधेयक अमेरिकेच्या प्रतिनिधीगृहात संमत झालं आहे”, असं वर्णन ट्रम्प यांनी या विधेयकाचं केलं असून लवकरात लवकर ते अंमलात आणण्याचा निर्धारही बोलून दाखवला आहे.
काय आहे डोनाल्ड ट्रम्प यांची पोस्ट?
अमेरिकेच्या प्रतिनिधीगृहानं पारित केलेल्या विधेयकाबाबत ट्रम्प म्हणतात, “अमेरिकेच्या इतिहासात मंजूर होणारं हे कदाचित सर्वात महत्त्वाचं विधेयक असेल. या विधेयकामध्ये मोठ्या प्रमाणावर करकपात प्रस्तावित करण्यात आली आहे. त्याशिवाय, टिप्सवर कोणताही कर आकारला जाणार नाही. ओव्हरटाईमच्या परताव्यावरही कर आकारला जाणार नाही. तुम्ही अमेरिकन बनावटीचं वाहन खरेदी केल्यास त्यावरील करामध्ये मोठी कपात करण्यात आली आहे”!
गोल्डन ग्लोबसाठी विशेष निधी
दरम्यान, अवघ्या दोनच दिवसांपूर्वी घोषणा केलेल्या गोल्डन ग्लोब प्रकल्पासाठी ट्रम्प प्रशासनाने मोठ्या प्रमाणावर विशेष निधी जाहीर केला आहे. अमेरिकेच्या हवाई हद्दीचं संरक्षण करण्यासाठी इस्त्रायलच्या ‘आयर्न डोम’च्या धर्तीवर अमेरिकेत ‘गोल्डन डोम’ची घोषणा ट्रम्प यांनी केली. या पार्श्वभूमीवर या डोमसाठी निधीची तरतूद नव्या विधेयकानुसार करण्यात आली आहे. त्याशिवाय, सीमेवर गस्त घालणाऱ्या पथकांसाठी वाढीव वेतनाचीही तरतूद या विधेयकात केल्याचं डोनाल्ड ट्रम्प यांनी त्यांच्या पोस्टमध्ये म्हटलं आहे.
विरोधकांना केलं लक्ष्य
दरम्यान, ट्रम्प यांनी डेमोक्रॅट पक्षावर या पोस्टच्या माध्यमातून हल्लाबोल केला आहे. “डेमोक्रॅट्सचा ताबा सुटला आहे. त्यांच्यात गोंधळाची परिस्थिती आहे. आत्मविश्वास, बांधीलकीचा अभाव आहे. त्यांना कदाचित नुकत्याच झालेल्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत त्यांच्या मोठ्या पराभवाचा विसर पडलेला दिसतोय”, असं ट्रम्प म्हणाले.
“विरोधक भूतकाळातच जगत असून त्यांना आशा वाटतेय की पुन्हा कधीतरी अमेरिकेच्या सीमा जागतिक गुन्हेगारांसाठी खुल्या होऊ शकतील, पुरुषांना महिलांच्या क्रीडाप्रकारात खेळता येईल. त्यांना हे समजत नाहीये की या आणि अशा अनेक बाबी आता परत कधीच अस्तित्वात येणार नाहीत”, अशा शब्दांत त्यांनी विरोधकांवर टीका केली आहे.