Donald Trump on Narendra Modi: या वर्षी एप्रिल महिन्यात अमेरिकेने सर्वप्रथम टॅरिफची घोषणा केली. डोनाल्ड ट्रम्प यांनी जगभरातल्या देशांवर वेगवेगळ्या प्रमाणात टॅरिफ लादलं. मधल्या काळात यात अनेक बदल झाले. सरतेशेवटी भारताबाबत ट्रम्प यांनी आधी २५ टक्के आणि त्यात नंतर पुन्हा २५ टक्के टॅरिफची भर घातली. हे नंतरचे २५ टक्के टॅरिफ भारत रशियाकडून कच्च्या तेलाची खरेदी करतो म्हणून करण्यात आल्याचं डोनाल्ड ट्रम्प यांनी जाहीरपणे सांगितलं आहे. भारतानं रशियाकडून तेलखरेदी थांबवण्यासाठी अमेरिकेकडून सातत्याने दबाव आणला जात होता. आता मोदींनी रशियाकडून तेलखरेदी थांबवली असल्याचा दावा डोनाल्ड ट्रम्प यांनी केला आहे.
नरेंद्र मोदींबाबत काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
डोनाल्ड ट्रम्प यांनी गुरुवारी व्हाईट हाऊसमध्ये प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी भारताबाबत व पंतप्रधान नरेंद्र मोदींबाबत त्यांनी त्यांची भूमिका मांडली. भारतानं मोठ्या प्रमाणावर रशियाकडून तेलखरेदी बंद केल्याचा उल्लेख करतानाच डोनाल्ड ट्रम्प यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींचा ‘महान व्यक्ती’ असा उल्लेख केला. शिवाय, ते पुन्हा एकदा मोदींना मित्र म्हणाले. या पार्श्वभूमीवर भारत-अमेरिका संबंध पुन्हा पूर्वपदावर येण्याची चिन्ह दिसत असली, तरी त्यासंदर्भात अमेरिकेच्या नेमक्या कोणत्या अटी भारत सरकारनं मान्य केल्या, यासंदर्भात मोठी चर्चा पाहायला मिळत आहे.
“भारताशी व्यापारविषयक चर्चा चांगल्या चालू आहेत. नरेंद्र मोदी माझे मित्र आहेत. आम्ही नेहमी बोलतो. त्यांनी रशियाकडून कच्च्या तेलाची खरेदी बंद केली आहे”, असं ट्रम्प म्हणाले. तसेच, “मी भारतात जावं, अशी मोदींची इच्छा आहे. हे कसं करायचं ते आम्ही ठरवू. मी भारतात जाईन. पंतप्रधान नरेंद्र मोदी एक महान व्यक्ती आहेत. मी त्यांना भेटायला पुढच्या वर्षी भारत दौऱ्यावर जाईन”, असं डोनाल्ड ट्रम्प म्हणाले.
डोनाल्ड ट्रम्प यांचे वारंवार भारताबाबत दावे!
दरम्यान, गेल्या काही महिन्यांपासून डोनाल्ड ट्रम्प वारंवार भारताबाबत दावे करताना पाहायला मिळत आहेत. भारत व पाकिस्तान संघर्षात मध्यस्थी केल्याचा दावा त्यांनी केला होता. तसेच, या वर्षाच्या अखेरपर्यंत रशियाकडून तेल खरेदी थांबवण्याचा शब्द मोदींनी आपल्याला दिल्याचाही त्यांचा दावा चर्चेत आला होता. त्याच दाव्याच्या पार्श्वभूमीवर ट्रम्प यांनी पुन्हा एकदा रशियाकडून तेलखरेदीबाबत भाष्य केलं आहे.
“रशियाकडून तेल खरेदी बंद केली जाईल, असं मला भारतानं सांगितलं आहे. ती एक प्रक्रिया आहे. तुम्हाला वाटलं आणि लगेच रशियाकडून तेलखरेदी बंद झाली असं होत नाही. या वर्षाच्या अखेरपर्यंत भारताकडून ही तेलखरेदी जवळपास शून्यापर्यंत आणली जाईल. भारत हा एक महान देश आहे”, असं डोनाल्ड ट्रम्प गेल्या महिन्यात म्हणाले होते.
